दहिसरमध्ये खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप

गणेशोत्सवाला काही दिवस राहिल्यामुळे पालिका आयुक्तांनी सर्व वॉर्डना आपापल्या विभागातील रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी वेगाने करण्याचे निर्देश दिले असताना दहिसरमधील रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. दहिसर-पूर्व ते पश्चिमेस जाणारे छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर आनंद नगर व  जरीमरी देवी मंदिराचे मुख्य जंक्शनवर मधला भाग सिमेंट काँक्रीटचा न बनवता फक्त पेव्हर ब्लॉक लावून तसेच अर्धवट सोडण्यात आले आहेत. त्यामुळे दहिसरकरांचा प्रवास खड्डय़ातून होत आहे.

गणेशोत्सवादरम्यान मुंबईकरांना खराब रस्त्याचा मनस्ताप होऊ नये यासाठी  जंक्शनची दुरुस्ती मास्टिक काँक्रीटने करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे काम अर्धवट करून पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने रस्त्यांच्या दुरुस्ती-डागडुजीचे काम करावे, अशी मागणी दहिसरकरांकडून करण्यात येत आहे.