मोदींचा आणखी एक हातगुण; स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्ता उखडला

महाराष्ट्रात वेळोवेळी लाडक्या कंत्राटदारांचे कारनामे समोर येत असताना आता गुजरातमध्येही लाडका कंत्राटदार असल्याचे उघड झाले असून मोदींचा आणखी एक हातगुण दिसला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्ता पुराच्या पाण्यात अक्षरशः उखडला गेला आहे. त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू आहे. काँग्रेसने याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला यायचे असेल तर तुमचे तुटलेल्या रस्त्यावर स्वागत आहे, हा रस्ता म्हणजे भलमोठं कोडं बनला असून जर तुम्ही सुखरूप स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहोचू शकलात तर तुम्हाला काही एक्स्ट्रा पॉईंट अशी खोचक पोस्ट काँग्रेसने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारला जावा म्हणून भूमिपूजन केले होते. 2018 मध्ये पुतळा उभा राहिला. यासाठी तब्बल 2989 कोटी खर्च करण्यात आले. दरम्यान, हेच का मोदींचे गुजरात मॉडेल, असा सवाल आता विरोधक करू लागले आहेत.