इलेक्टोरल बॉण्डप्रकरणी भाजप नेत्यांची चौकशी करणार; मिसा भारती यांचा मोदी सरकारवर घणाघात

आपले सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गजाआड करू, अशा शब्दांत राजदच्या नेत्या मिसा भारती यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. त्यांच्या या विधानावरून खळबळ उडाली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्डप्रकरणी जो निर्णय दिला आहे त्याअंतर्गत आपले सरकार केंद्रात आल्यास सर्व भाजप नेत्यांची चौकशी करू असे आपण म्हटले होते, असे मीसा भारती यांनी म्हटले आहे.

मी जे काही बोलले होते ते पूर्णपणे ऐकले गेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्डप्रकरणी जी टीपण्णी केली होती, त्याची पूर्ण चौकशी केली जाईल आणि जे दोषी आढळतील त्यांना गजाआड करू असे म्हटले होते, अशी माहिती मिसा भारती यांनी दिली. प्रचारादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मीसा भारती यांनी प्रतिक्रीया दिली. मोदींबद्दल काहीच चुकीचे बोललो नव्हतो असे सांगत त्या आपल्या विधानावर
ठाम राहील्या.

पंतप्रधानांकडे मुद्दा नाही

भाजपा सरकार सीबीआय, ईडी या तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांच्या ठिकाणांवर धाडी टाकत आहे, पंतप्रधानांकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही. बेरोजगारी, महागाई यावर ते बोलत नाहीत. मीडिया सेट करणे हादेखील भाजपाचा अजेंडा आहे. हा अजेंड देशातील जनतेसमोर चालणार नाही, असेही मिसा भारती यांनी म्हटले आहे.