आरटीईच्या 25 टक्के कोटय़ातंर्गत शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत उद्या 31 मे रोजी संपणार आहे. यंदा आरटीई प्रवेशात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. आरटीईच्या राज्यातील 1 लाख 5 हजार 89 जागांसाठी आतापर्यंत तब्बल 2 लाख 13 हजारांहून विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण आहे. आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशासाठी प्रत्येक जिह्यातून प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे यंदा मोठय़ा प्रमाणावर प्रवेशावेळी स्पर्धा होणार आहे. लॉटरी पद्धतीने आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. लॉटरीत नाव आल्यावर विद्यार्थ्याने दिलेल्या मुदतीत संबंधित शाळेत जाऊन योग्य कागदपत्रांसह प्रवेश घेणे आवश्यक आहे. प्रवेश फेरी पार पडल्यानंतरही जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत अशा रिक्त जागांवर प्रतीक्षा फेरीअंतर्गत प्रवेश केले जाणार आहेत. यंदा आरटीई प्रवेशाच्या दोन सोडती जाहीर होण्याची शक्यता असून या फेरीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.