रिझर्व्ह बँकेचा पाच विकेटस्नी विजय

34 धावांत 4 विकेटस् आणि 35 धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणाऱया अमेय दांडेकरच्या जोरावर आरसीएफ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेण्टी चषक आंतर-कार्यालय क्रिकेट स्पर्धेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पहिल्या फेरीत सिप्ला एससीवर 5 विकेटस् राखून मात केली.

आरबीआयने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी अचूक मारा करताना सिप्ला एससीला 20 षटकांत 9 बाद 148 धावांवर रोखले. अमेयने चार विकेट घेत त्याला मोलाचा वाटा उचलला. विजय कुमावत आणि जय नायकने प्रत्येकी 2 विकेट घेत त्याला सुरेख साथ दिली. प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान आरबीआयने 5 विकेटस्च्या बदल्यात 14.4 षटकांत पूर्ण केले. तेजस कल्याणकरने सर्वाधिक 49 धावा काढल्या. अमेयने फलंदाजीतही नशीब अजमावताना 35 धावांचे योगदान दिले. शुभम चगने नाबाद 31 आणि रमनप्रीत सिंगने 27 धावा करताना संघाला लवकर विजय मिळवून देण्यात हातभार लावला.