धनगर समाजाचे पंढरपुरातील आरक्षण उपोषण स्थगित

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे व त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू होते. विविध मार्गाने आंदोलन तीव्र करण्यात आले. आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी आज सहाही उपोषणकर्त्यांनी विशाल कोकरे यांच्या हातून सरबत घेत आंदोलन तात्पुरते स्थगित केले. दरम्यान, सरकारने आरक्षणाचा जीआर तातडीने काढावा; अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, धनगर समाजाचे सहाही उपोषणकर्ते दीपक बोऱहाडे, माऊली हळणवर, गणेश केसकर, योगेश धरम, विजय तमगर, यशवंत गायके हे उद्या (बुधवार) छत्रपती संभाजीनगरकडे जाणार आहेत. संभाजीनगरात जात पडताळणी कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे. इतकेच नाही तर धनगर जातीचे प्रमाणपत्र रद्द होईपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्काम ठोकला जाणार असल्याचे उपोषणकर्ते दीपक बोऱहाडे यांनी सांगितले. या आंदोलनासाठी धनगर समाजाने मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पंढरपूर येथे आज उपोषणाच्या सोळाव्या दिवशी धनगर समाजाने पंढरपुरात धनगर समाजाचे शिबिर घेण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, शासनाने वेळेत जीआर काढावा अन्यथा धनगर समाज सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.