पडघम उत्सवाचे – सांताक्रुझच्या यशवंत नगरमध्ये साकारले भव्य राम मंदिर, खांबांवर आकर्षक कोरीव काम आणि रोषणाई

गेल्या 39 वर्षांपासून हिंदु संस्पृतीची परंपरा आणि कला जपणाऱ्या सांताक्रुझच्या यशवंत नगरमध्ये यंदा गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील राम मंदिराची भव्य अशी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यशवंत नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वाकोला, शिवसेना शाखा क्रमांक 91 चे यंदाचे 40 वे वर्ष आहे. राम मंदिरातील बारीकसारीक गोष्टी या राम मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये साकारण्यात आल्या आहेत. खांबांवरील कोरीव, नक्षीकाम डोळय़ात चटकन भरणारे आहे. आकर्षक रोषणाईमुळे असून मंदिरात आल्यानंतर मनाला मिळणारी शांतता, अध्यात्मभाव आणि प्रसन्नता गणेशभक्तांना अनुभवता येणार आहे.

सुख, समृद्धी आणि समाधान तसेच शांती जिथे नांदते तिथे रामराज्य अवतरते. जनतेच्या अपेक्षाही याच आहेत, असे मंडळाचे कार्याध्यक्ष, आमदार संजय पोतनीस म्हणाले.  महाराष्ट्रासह देशभरात घडत असलेल्या घटना, अत्यंत गढूळ झालेले सामाजिक वातावरण या पार्श्वभूमीवर देशात रामराज्य यावे अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. हे लक्षात घेऊन यंदा यशवंत नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. चटकन नजरेत भरेल असा मंदिराचा कळस, रंगरंगोटी आणि आकर्षक रोषणाई यामुळे प्रत्यक्ष राम मंदिरात आल्याचा अनुभव गणेशभक्तांना मिळेल, असे मंडळाचे अध्यक्ष गोविंद गायकर म्हणाले.

n मंदिर तब्बल 50 बाय 25 फूट असून मंदिराची उंची 50 फूट इतकी आहे. तसेच मंदिरावर तीन मोठे कळस बसवण्यात येणार आहेत. n मंडळाने आतापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाने अनेक बक्षिसे पटकावली आहेत. कमी जागेत अतिशय भव्य अशी देशभरातील, महाराष्ट्रातील विविध भव्य मंदिरांच्या प्रतिकृती आतापर्यंत मंडळाने उभारल्या आहेत. या देखाव्यांना गणेशभक्तांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

बाप्पाची मूर्तीही प्रभू श्रीरामाच्या अवतारात

राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या अवतारात गणपती बाप्पाची मूर्तीही विराजमान होणार आहे. अयोध्येतील रामाची बालरूपातील मूर्ती अत्यंत आकर्षक अशीच आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीमधील सर्व बारकावे अतिशय सुंदररीत्या बाप्पाच्या मूर्तीमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे जणू काही राम मंदिरातच आल्याप्रमाणे गणेशभक्तांना अनुभव मिळेल, असे आमदार संजय पोतनीस यांनी सांगितले.

अयोध्येतील राम मंदिरातील बारकावे टिपले

राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारताना आर्टिस्ट सतीश मिश्रा यांनी अयोध्येतील मंदिरातील सर्व बारकावे टिपले. ते यशवंत नगर गणेशोत्सव मंडळासाठी गेल्या सहा वर्षांपासून वेगवेगळय़ा मंदिरांच्या प्रतिकृती उभारत आहेत. मंदिराच्या खांबांमध्ये प्रभू श्रीराम आणि त्यांचे अयोध्येत आगमन होताना केलेले भव्य स्वागत असा प्रसंग कोरण्यात आल्याने मंदिराची शोभा  वाढते, असे सतीश मिश्रा यांनी सांगितले.