मशाल घरोघर पोहोचवून महाराष्ट्रातला अंध:कार दूर करा! आदित्य ठाकरे यांचे आवाहन

लोकशाहीचा लढा संपलेला नाही. शिवसेनेला न्यायालयात न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही जनतेच्या न्यायालयात आलोय. ही लढाई पदासाठी, मुख्यमंत्रीपदासाठी, सत्तेसाठी, पैशासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे असे सांगतानाच, महाराष्ट्र विकायला काढणाऱ्या गद्दारांना गाडून टाका! शिवसेनेची मशाल घरोघर पोहोचवून महाराष्ट्रातला अंधःकार दूर करा, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुखआमदार आदित्य ठाकरे यांनी केले.

जळगावच्या पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारी वैशाली सूर्यवंशी यांनी आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी झालेल्या भव्य सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी पाचोराकरांना मार्गदर्शन केले. वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज पहिल्यांदा आपण पाचोरा इथे आलोय. वैशाली सूर्यवंशी या पाचोऱ्यातील दिवंगत नेते आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या आहेत. आणि तात्यासाहेब आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जवळचे नाते आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी या जाहीर सभेत मार्गदर्शनाला सुरुवात केली.

वैशाली सूर्यवंशी यांच्यासमोर त्यांचे बंधू किशोर पाटील हे मिंधे गटातून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. मार्गात कितीही निखारे असले तरी पाचोऱ्यातून विजय मिळवू, असा विश्वास निष्ठा यात्रेच्या वेळी वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्याला दिला होता याची आठवणही आदित्य ठाकरे यांनी यावेळी करून दिली. आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेशी गद्दारी केलेल्या मिंधे गटावर जोरदार टीका केली. खोक्यांना हात लावला नाही असे निर्लज्ज गद्दारांनी एकदा तरी शपथ घेऊन सांगितलेय का, असा संतप्त सवाल करतानाच, जे महाराष्ट्राला विकू शकतात ते उद्या आपल्यालाही विकू शकतात हे लक्षात घ्या, असे आदित्य ठाकरे उपस्थितांना म्हणाले.

राज्यातील वाढत्या बेरोजगारीवरूनही आदित्य ठाकरे यावेळी मिंधे सरकारवर तुटून पडले. ते म्हणाले की, राज्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट बनलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने मिंधे सरकारपेक्षा कितीतरी पटीने अधिक उद्योग महाराष्ट्रात आणले. हिंमत असेल तर मिंध्यांच्या उद्योगमंत्र्यांनी किती उद्योग आणले ते जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

शिवसेनेने मागच्या महिन्यात मुंबईतील रोजगार मेळाव्यात जवळपास 12 हजार तरुणांना रोजगार दिले, असे सांगतानाच महाविकास आघाडीचे सरकार अजूनही असते तर किती रोजगार दिले असते याचा विचार करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दर तीन महिन्यांनी जिह्याजिह्यात रोजगार मेळावे आयोजित करू असे आश्वासनही त्यांनी दिले.

याप्रसंगी शिवसेना उपनेते-संपर्कप्रमुख संजय सावंत, चाळीसगाव विधानसभेचे उमेदवार उन्मेष पाटील, जिल्हा सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ,  जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व दीपक राजपूत, जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, एकलव्य सेना अध्यक्ष सुधाकर वाघ आदी उपस्थित होते.

लाडक्या बहिणीला वाढीव रक्कम देऊन सुरक्षित बहीणही आणू

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणीला वाढीव रक्कम देऊन त्याबरोबर सुरक्षित बहीण योजनाही आणू असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले. अदानीला एक लाख कोटी देताना महिलांना फक्त दीड हजार देता? मग महिलांच्या सुरक्षेबद्दल कोण बोलणार, असा सवालही त्यांनी मिंधे सरकारला केला.

सांगोल्यात पैशाने भरलेली एक गाडी पकडली गेली होती. निवडणूक आयोगाने जळगावातही एक गाडी पकडली. त्यातही पैसे सापडले. तो पापाचा आणि शापाचा पैसा आहे. त्याला तुम्ही हात लावणार का, असे आदित्य ठाकरे यांनी विचारले असता उपस्थितांनी जोरदार नकार देतानाच ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणा दिल्या.