पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर ‘रेमल’ चक्रीवादळ आदळले! किनारपट्टीवर वादळी वार्‍यासह तुफान पाऊस

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘रेमल’ चक्रीवादळ रविवारी मध्यरात्री किनारपट्टीवर आदळले. यामुळे उपसागरातील बेटांवर तसेच किनारपट्टीवर वादळी वार्‍यासह तुफान पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरे कोसळली. वादळाच्या धुमशानात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘रेमल’ चक्रीवादळ रविवारी मध्यरात्री किनारपट्टीवर धडकले. चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेऊन पश्चिम बंगाल प्रशासनाने अगोदरच किनारपट्टीवरील दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. वादळ धडकताच कोलकात्यासह इतर ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. उपसागरातील बेटांवर वादळाने धुमशान घातले. किनारपट्टीवरील अनेक गावांमध्ये झाडे उन्मळून पडली. तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

रेल्वे, विमानसेवा बंद
‘रेमल’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने दक्षिण तसेच उत्तर 24 परगणा, मेदिनीपूर जिल्ह्यातील रेल्वे सेवा बंद ठेवली होती. कोलकाता विमानतळावरील विमान सेवाही 24 तासांसाठी रद्द करण्यात आली होती. यामुळे बागडोगरा, गुवाहाटी, दिब्रुगड, जोरहाट, दिमापूरला जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली. कोलकात्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरील वाहतूकही 12 तासांसाठी थांबवण्यात आली होती.