रेखा जरे हत्याकांडाची आजपासून सुनावणी; आठ साक्षीदारांना बजावले समन्स

‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडाची सुनावणी उद्यापासून (दि. 3) नगर जिल्हा न्यायालयात होणार आहे. या सुनावणीसाठी आठ साक्षीदारांना समन्स बजाविण्यात आले आहे. दरम्यान, आजारी असल्याने जामिनावर सुटका व्हावी, अशी मागणी मुख्य आरोपी बाळ बोठे याने अर्जाद्वारे न्यायालयास केली होती. मात्र, 27 जून रोजी झालेल्या सुनावणीवेळी त्याने हा अर्ज मागे घेतला.

रेखा जरे यांचे 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात हत्याकांड घडले होते. या हत्याकांड प्रकरणात सहा मुख्य आरोपी आहेत. बाळ बोठेसह ज्ञानेश्वर उैर्फ गुड्डू शिंदे, आदित्य चोळके, फिरोज शेख, हृषीकेश पवार व सागर भिंगारदिवे या सहा आरोपींविरुद्ध आरोपनिश्चिती झाली आहे. शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चाकाली व अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ (सर्व रा. हैदराबाद, आंध्र प्रदेश), ऍड. जनार्दन अकुला चंद्रप्पा (रा. हैदराबाद) आणि नगरमधील महेश तनपुरे (रा. नवलेनगर, सावेडी) या पाचजणांवर मुख्य आरोपी बाळ बोठेला मदत केल्यामुळे आरोपनिश्चिती झाली आहे. आरोपी बोठेला पसार असताना मदत केलेली पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ही महिला अजूनही पसार आहे.

दरम्यान, रेखा जरे हत्याकांडास अडीच वर्षे झाली. या प्रकरणाच्या सुनावणीची प्रतीक्षा होती. तिला अखेर मुहूर्त लागला आहे. उद्यापासून (दि. 3) या प्रकरणाची नियमित सुनावणी नगर जिल्हा न्यायालयात होणार आहे. 3 तारखेला साक्ष देण्यास उपस्थित राहावे म्हणून आठ साक्षीदारांना समन्स बजाविण्यात आले आहे. या घटनेतील सर्व मुद्देमालही न्यायालयासमोर हजर झाला आहे. त्यामुळे आता नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

रेखा जरे हत्याकांडातील आरोपींचा तातडीने तपास करण्यात यावा, अशी मागणी अनेक संघटनांनी केली होती. या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पकडण्यात यश आले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील व तपासी अधिकारी अजित पाटील यांनी या प्रकरणाचा छडा लावून मुख्य आरोपीला अटक केली. मुख्य आरोपी बाळ बोठे याचा तपासादरम्यान जप्त केलेला आयफोन उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ऍड. सुरेश लगड यांनी नगर पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.