इतर न्यायालयात सुरू असलेल्या खून खटल्यांच्या कामकाजामुळे रेखा जरे खून खटल्याच्या नियमित (दर दिवशी) सुनावणीसाठी उपस्थित राहता येत नसल्याने या खटल्याचे कामकाज पाहण्यास सरकारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी नकार दिला आहे. तसेच जामखेड येथील विशाल सुर्वे खून खटल्याचेही कामकाज पाहण्यास त्यांनी नकार दिला असून तसे त्यांनी न्यायालयाला आणि विधी व न्याय मंत्रालयाला कळविले आहे.
रेखा जरे आणि विशाल सुर्वे खून खटल्याचे कामकाज अॅड.यादव- पाटील पाहत होते. रेखा जरे खून खटल्यातील संशयित आरोपींनी खटल्याची सुनावणी दर दिवशी घेण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे केली होती. त्यानंतर खंडपीठाने ही सुनावणी दर दिवशी ठेवली होती. दरम्यान अॅड. यादव-पाटील यांच्या कार्यव्यस्ततेमुळे त्यांनी जरे खून खटल्याची सुनावणी बुधवारी आणि गुरूवारी घेण्याचे सूचित करून न्यायालयाला तशी विनंतीही केली होती. तथापि, इतर खटल्यातील व्यस्थतेमुळे अॅड. यादव-पाटील जरे खटल्यात मागील सुनावणीच्या वेळी उपस्थित नव्हते. याच कारणांचा फायदा घेऊन संशयित आरोपी बाळ बोठे याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.
दरम्यान, इतर खटल्याच्या कार्यव्यस्ततेमुळे रेखा जरे आणि विशाल सुर्वे या दोन खटल्यातून अॅड.यादव-पाटील बाहेर पडले असून त्यासंबंधीचे पत्र त्यांनी विधी व न्याय मंत्रालयाला पाठविले आहे. यावर विधी व न्याय मंत्रालय निर्णय घेणार असल्याचे समजते. अॅड. यादव-पाटील त्यांच्या अनुपस्थिमध्ये जरे खून खटल्याची सुनावणी कशी होते, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.