फेब्रुवारी अखेरपर्यंत भरती प्रक्रिया राबवणार
महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना शिक्षकांची संख्या मात्र कमी आहे. शिक्षकांची कमतरता भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या चार माध्यमांतील शाळांमध्ये 1 हजार 342 शिक्षकांची जम्बो भरती करण्यात येणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबई महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. मात्र गेल्या काही वर्षांत शिक्षकांची भरती झालेली नाही. प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने चार माध्यमांसाठी तब्बल 1 हजार 342 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोठी पदभरती होणार असून त्यासाठी जाहिरात दिली जाणार आहे.
पवित्र पोर्टलवरून संधी
पालिकेच्या शिक्षण विभागातील रिक्त पदे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत. शिक्षण विभागाने याकरिता जाहिरात दिली असून पात्र उमेदवारांना 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर छाननी करून मग त्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत कागदपत्रांची पडताळणी करून मग त्यांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. ही प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
पालिकेच्या 8 भाषिक शाळा
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा 8 भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे 1 हजार 129 शाळांमध्ये मिळून सध्या 3 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनानंतर पालिका शाळांतील पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. सीबीएसईच्या शाळा, इतर बोर्डांच्या शाळा, शैक्षणिक वस्तू वाटप यामुळेही विद्यार्थी संख्या वाढली आहे.