मंदिरांना खरा धोका भाजप आणि भाजपच्या दलालांपासून, आदित्य ठाकरे यांची घणाघाती टीका

”आज भाजपचे अनेक लोक येथे येऊन (दादर पूर्व येथील हनुमानाचं मंदिरात) गेले. खरं पाहायला गेलं तर रेल्वे खातं भाजपचं आहे. केंद्रात सरकारही यांचं आहे. नोटीसही भाजपने दिली आणि त्याच लोकांनी येथे येऊन नाटकं केली. हा त्यांचा दुतोंडीपणा आपण उघड केला आहे. निवडणुकीच्यावेळी खोट्या बातम्या पसरवतात की, वक्फ बोर्डने सिद्धिविनायक मंदिरावर दावा केला आहे. या ना त्या मंदिरावर दावा केला आहे. पण खरा धोका आपल्या मंदिरांना भाजप आणि भाजपच्या दलालांपासून आहे”, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज दादर पूर्व येथील हनुमानाचं दर्शन घेऊन महाआरती केली. यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले के, ”अनेक वर्ष मी माझे आजोबा म्हणजेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ऐकत आलोय, जेव्हा मी वेगवेगळ्या मंदिरात जातो, नांदेडच्या गुरुद्वारात गेलो, कधी येथे मंदिरात गेलो. कुठल्याही धार्मिक स्थळी गेलो, तरी त्यांच्याबद्दल एक आदराची भावना असते. मात्र खास करून जुहू येथील इस्कॉन मंदिर असेल, आमच्या एमआयजी कॉलनी येथे साईबाबांचे मंदिर असेल तिथे गेल्यानंतर, त्यांच्या (बाळासाहेबांच्या ) हाकेत जी ताकद होती, ती सतत तेथील सगळे पुजारी आणि ट्रस्टी सांगत असतात की, आमचं मंदिर वाचलं ते फक्त एका व्यक्तीमुळे वाचलं, ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. तीच ताकद आता उद्धवसाहेब पुढे घेऊन चालले आहेत. त्यांच्या नावात देखील पक्षप्रमुख आहे, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकद काय आहे, ही आज आपण दाखवून दिली आहे. ही ताकद दाखवत असताना आपण आणखी एक ताकद दाखवली आहे की, आपल्या धर्माचा प्रचार करत असताना असताना दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करण्याची गरज नसते. दुसऱ्यांवर चालून जाण्याची गरज नसते. भाजपचे चुनावी हिंदुत्व आहे. आपल्या सगळ्या हिंदू लोकांना भाजप फक्त निवडणुकीपुरती वापरतं. वापरा आणि फेकून द्या, असं ते करतात. हे देखील आपण उघड केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्याआधी मी आणि आई दर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळी तिकडच्या पुजाऱ्यांनी मला सांगितलं, जितकी मंदिरे भाजप सरकारने कॉरिडॉरच्या नावाखाली तोडली, तितकी आपल्या देशाच्या इतिहासात कोणीही तोडली नसतील. यात प्राचीन मंदिरांचाही समावेश आहे. तिथे कुठल्याही घरात तुम्ही जा, त्यांनी मुर्त्या तोडल्या आहेत. का? तर त्यांना कॉरिडॉर घ्यायचं होतं.”

ते म्हणाले, ”अयोध्याचे मंदिर होण्याआधी आपण तिथे गेलो होतो. त्यावेळी आपण म्हटलं होतं, आधी मंदिर, मग सरकार. तिथे त्यांचं सरकार बसलं, आपल्या हाकेमुळे सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिला. मात्र त्यानंतर आपण पाहिलं असेल, मंदिराच्या अवतीभवती ट्रस्टने ज्या जागा घेतल्या आहेत, त्या सगळ्या जागा बिल्डर मंगलप्रभात लोढा यांना विकल्या. तेच बिल्डर लोढा कारसेवकांना मोफत घर देणार आहेत का?”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ”जशी श्री हनुमानाची छाती फाडली, त्यात राम, लक्षण आणि सीता होत्या. तशी जर आज आमची छाती फाडून पाहिली, तर आमच्या छातीत या देशाचा संविधान आहे, या देशाचा नागरिक आहे आणि हा देश आहे. उगाच आमच्या मंदिरावर आणि महाराष्ट्रावर येऊ नका. जेव्हा जेव्हा आपल्या महाराष्ट्रासाठी गरज लागेल, आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, लढावं लागलं आणि जिंकावंच लागेल.”