घर, कार घेणाऱ्यांच्या पदरी निराशाच; यावेळीही व्याजदर जैसे थेच ठेवणार

एकीकडे महागाईने कहर केलेला असताना व्याजदरात तरी थोडा दिलासा मिळेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. परंतु नवीन वर्षात घरखरेदी किंवा कार खरेदी करणाऱ्यांच्या पदरी निराशाच येणार आहे. कारण यावेळीही व्याजदर जैसे थेच ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण आढावा समितीची बैठक 7 ते 9 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या बैठकीत व्याजदराबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

याआधीची बैठक ऑगस्टमध्ये झाली होती. त्यात समितीने सलग नवव्यांदा दर बदलले नाहीत. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये होणाऱया बैठकीत व्याजदरात कोणताही बदल अपेक्षित नसल्याचे दिसत आहे. आरबीआयचे गर्व्हनर 9 ऑक्टोबर रोजी बैठकीच्या निर्णयांची माहिती देणार आहेत. दर दोन महिन्यांनी ही बैठक होते. फेब्रुवारी 2023 मध्ये आरबीआयचे शेवटचे दर 0.25 टक्के ते 6.5 टक्क्याने वाढवले होते.

 याआधी 18 सप्टेंबर रोजी यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.5 टक्के कपात केली होती. चार वर्षांनी केलेल्या या कपातीनंतर व्याजदर 4.75 ते 5.25 टक्क्यांदरम्यान होते.

 27 मार्च 2020 ते 9 ऑक्टोबर 2020 दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात दोनदा 0.40 टक्क्के कपात केली. यानतंर पुढील 10 बैठकांमध्ये सेंट्रल बँकेने व्याजदर पाच वेळा वाढवले, चार वेळा कोणताही बदल केला नाही आणि ऑगस्ट 2022 मध्ये एकदा 0.50 टक्क्यांनी कपात केली. कोविडपूर्वी 6 फेब्रुवारी 2020 रोजी रेपो दर 5.15 टक्के होता.