Inflation – वाढत्या महागाईवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं विधान

देशाच्या अर्थव्यवस्थेत सद्यस्थितीत मोठी उलथापालथ सुरू आहे. विदेशी वित्तीय संस्था बाहेर पडत आहेत. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहेत. महागाईचा दर वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठे विधान केले आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यात येईल, असे शक्तिकांत दास म्हणाले.

जगभरातील अनेक समस्यांमुळे महागाईवर दबाव कायम आहे. पण देशात महागाई आणि विकास यांच्यात ताळमेळ आहे. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत आहे. सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत महागाई नियंत्रणा आणली जाईल, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले.

हवामानातील अनिश्चितता आणि भू-राजकीय समस्यांमुळे महागाईचा आकडा आमचे लक्ष्य असलेल्या 4 टक्क्यांच्या वर गेला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत यामध्ये सुधारणा होईल, असा विश्वास शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिरता आणि ताकद यामुळे पतधोरण विषयक समितीला व्याजदरांव्यतिरिक्त महागाईवर लक्ष केंद्रीत करण्याची संधी मिळाली आहे. कोविड 19 चे दुष्परिणाम असूनही आम्ही गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये सुमारे 8 टक्के आर्थिक विकास दर राखला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्येही हा दर 8 टक्क्यांच्या जवळ म्हणजे 7.2 टक्के राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच जगावर घोंगावत असलेल्या आर्थिक मंदीच्या संकटाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक मिळून काम करत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.