आरबीआय गव्हर्नर म्हणतात, देशाची आर्थिक स्थिती आणि महागाईचा अभ्यास करणार; संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारला

new-rbi-governor-revenue-secretary-sanjay-malhotra

देशाची आर्थिक स्थिती, मंदावलेला आर्थिक विकास दर आणि महागाई या सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास करून बँकिंग व्यवस्था मजबूत करण्यावर आणि आर्थिक स्थैर्य राखण्यावर भर देऊ, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केले.

पेंद्रीय अर्थ मंत्रालयातील महसूल विभागाचे सचिव असलेल्या संजय मल्होत्रा यांनी आज आरबीआयच्या गव्हर्नर पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी देशाची आर्थिक घडी नीट करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मल्होत्रा यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे.

जनहिताचे निर्णय घेऊ

देशाच्या आर्थिक विकासातही रिझर्व्ह बँक महत्त्वाची भूमिका बजावते. आरबीआयचे गेल्या काही वर्षांतले काम कौतुकास्पद आहे. त्याचा वारसा पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन. धोरणात स्थिरता आणणे महत्त्वाचे असून जनहिताचे निर्णय घेतले जातील, असे मल्होत्रा म्हणाले.

जीडीपी, ठेवी घटल्या

ऑक्टोबरमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 14 महिन्यांच्या उच्चांकी 6.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी वाढ सात तिमाहीतील सर्वात कमी 5.4 टक्क्यांपर्यंत घसरला. नोकरदारापासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांनी व्याजदर कपात सूचवली आहे. मात्र, आरबीआयने गेल्या दोन वर्षांपासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नसल्याने सर्वांची निराशा झाली आहे. दरम्यान, एकेकाळी बँकांमधील ठेवी 2.86 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या होत्या. मात्र, 28 ऑगस्टला ती एक लाख कोटींपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात चिंता आहे.