ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रवींद्र टोंगे यांची तब्येत खालावली

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचा समावेश ओबीसी आरक्षणात करू नये, बिहारच्या धर्तीवर ओबीसी जनगणना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी कार्यकर्ते रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन गेल्या 11 दिवसांपासून सुरू आहे. आता टोंगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर आंदोलनस्थळीच उपचार सुरू आहेत.

जालना येथे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी अर्धे मंत्रिमंडळ गेले. मात्र चंद्रपुरात 400 ओबीसी जातींच्या मागण्यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे. सरकार एकीकडे सत्तेतील ओबीसी खासदार- ओबीसी मंत्री यांचा दाखला देते आहे. मात्र, आरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर चर्चा करत नाही हे दुर्दैवी असल्याचे ओबीसी नेत्यांनी म्हटले आहे.