
पुण्याच्या रवींद्र जाधवने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) पुरुषांच्या वरिष्ठ निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात तब्बल 28 षटकारांचा घणाघात करीत नवा विक्रम प्रस्थापित केला. याआधी 2016 मध्ये प्रीतम पाटीलने पीवायसी हिंदू जिमखाना संघाकडून खेळताना एकाच डावात 26 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता, मात्र रवींद्रने 28 षटकारांचा पाऊस पाडत प्रीतमचा तो विक्रम मोडीत काढला हे विशेष. धानोरीच्या किंज स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या या दोनदिवसीय लढतीत युनायटेड क्लबकडून खेळताना रवींद्र जाधवने नॉर्थ झोन संघाविरुद्ध हा पराक्रम केला. नॉर्थ झोन संघाला पहिल्या डावात 43 षटकांत 144 धावांत गुंडाळल्यानंतर युनायटेड क्लबने रवींद्र जाधवच्या 278 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर 53.5 षटकांत 468 धावांचा डोंगर उभारून पहिल्या डावात 324 धावांची महाकाय आघाडी घेतली. रवींद्र जाधवच्या 132 चेंडूंतील 278 धावांच्या खेळीला 28 षटकार आणि 17 चौकारांचा साज होता. मग युनायटेड क्लबने नॉर्थ झोन संघाला दुसऱया डावात 31.2 षटकांत 186 धावांत गुंडाळून एक डाव आणि 138 धावांनी हा सामना जिंकला.