Ind Vs Nz 3rd Test Mumbai – रवींद्र जडेजाची ऐतिहासिक कामगिरी, जगातील 5 दिग्गज गोलंदाजांना सारलं मागे

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांची अष्टपैलू रवींद्र जडेजाने दाणादण उडवली. त्याने न्यूझीलंडच्या अर्ध्या संघाला तंबूचा रस्ता दाखवत जगातील पाच दिग्गज गोलंदाजांना मागे सारलं आहे.

न्यूझीलंडला पहिला डाव 235 धावांवर आटोपला. रवींद्र जडेजाने केलेल्या घातक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. रवींद्र जडेजाने व्हिल यंग, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, सोधी आणि मॅट हेन्री यांना तंबुचा रस्ता दाखवला. जडेडाने या धमाकेदार कामगिरी सोबत कसोटी क्रिकेटमध्ये 77 सामन्यांमध्ये 314 विकेटचा टप्पा पार केला आहे. या बाबतीत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये जगभरातील पाच दिग्गज गोलंदाजांना मागे सारले आहे. या पाच खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा लान्स गिब्स (309 विकेट), दक्षिण आफ्रिकेचा मॉर्नी मॉर्केल (309 विकेट), ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली (310 विकेट), टीम इंडियाचे इशांत शर्मा (311 विकेट) आणि जहीर खान (311 विकेट) यांचा समावेश आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या हिंदुस्थानी गोलंदाजांच्या बाबतीत रवींद्र जडेजाने आता पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. रवींद्र जडेजाच्या पुढे हरभजन सिंग (417 विकेट), कपिल देव (434 विकेट), आर. अश्विन (533 विकेट) आणि अनिल कुंबळे (619 विकेट) यांचा समावेश आहे.