कसब्यात धंगेकर स्वतःचा अजेंडा राबवतात! अंतर्गत गटबाजीमुळे कसब्यात काँग्रेस बॅकफूटवर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर काँग्रेसमधील वाद उफाळून आला आहे. शहराध्यक्ष बदलण्यावरून काँग्रेसमधील समोर आलेली गटबाजी थेट कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोधापर्यंत येऊन पोहोचली आहे. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली आहे. जो काँग्रेस नेता बैठका, आंदोलनाला उपस्थित नसतात, जे आपल्या मतदारसंघात स्वतःचा अजेंडा राबक्तात त्यांना विधानसभेची उमेदवारी देताना विचार करण्याची मागणी शिंदे यांनी पक्षाकडे केली आहे. त्यांनी धंगेकर यांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख स्पष्ट झाला आहे.

आगामी विधानसभा, महापालिका निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाला पुण्यात सक्षम करण्यासाठी तातडीने शहर नेतृत्वात बदल करावा, अशी मागणी काँग्रेसमधील एका शिष्टमंडळाने पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेत्रीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आता पुण्यातील नेत्यांनी थेट दिल्ली गाठून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. अद्याप असंघटनात्मक कोणतेही बदल झाले नसले त्तरी ही अंतर्गत गटबाजीची धग कायम आहे. या बैठकीत काँग्रेस वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत शहराध्यक्ष अरबिंद शिंदे यांनी वरिष्ठांकडे कसब्यातून विधानसभा उमेदवारीबाबत मागणी केली आहे. आतापर्यंत तुम्ही ज्यांना उमेदवारी दिली, त्यांनी फ्लेक्सवर आपल्या वरिष्ठ नेत्यांचा फोटो छापला का? तो व्यक्ती काँग्रेस पक्षाच्या विचाराशी एकरूप आहे का? जर नसेल तर त्या उमेदवाराबाबत आपण विचार करावा, असे सांगत अरविंद शिंदे यांनी नाव न घेता आमदार रवींद्र धंगेकरांबाबत खदखद व्यक्त केली आहे. जो कोणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे फोटो लावणार नाही, अशांना उमेदवारी देऊ नका. व्यक्तिगत राजकारण करणाऱ्यांना पक्ष संधी देणार नाही, मतदारसंघात आपला स्वतः चा अजेंडा राबवणाऱ्या आणि काँग्रेस विचाराशी एकरूप नसणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी शिंदे यांनी केली.

पक्षातून विरोध धंगेकरांना महागात पडणार!
शहराध्यक्ष बदलापासून ते विधानसभा उमेदवारीला विरोधापर्यंत काँग्रेसचा अंतर्गत वाद उफाळला आहे. कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध सुरू झाल्याने पोटनिवडणुकीत कसब्यात चर्चेत आलेला धंगेकर पॅटर्नला तडा जाण्याची शक्यता असून अंतर्गत बाद धंगेकरांना महागात पडणार का? हे निवडणुकांतून समोर येईल.