रत्नागिरी शहरात पाणीकपात केली असताना आज दुपारी जयस्तंभ परिसरातील रस्त्यावर जलवाहिनी फुटली.फुटलेल्या जलवाहिनीतून मधून हजारो लीटर पाणी वाया गेले.जयस्तंभ येथील रस्ता जलमय झाला होता.
रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात फक्त वीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.यंदा मान्सून लांबल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते म्हणून 13 मे पासून रत्नागिरी शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.दरम्यान पाणी कपात सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी रत्नागिरी शहरातील जयस्तंभ परिसरात जलवाहिनी फुटली.जलवाहिनीतून हजारो लीटर पाणी वाहून गेल्याने रस्ता जलमय झाला.एकीकडे नागरिक पाण्यापासून वंचित असताना फुटणाऱ्या जलवाहिनीमुळे पाणी संकट ओढावत आहे.दुपारी फुटलेल्या जलवाहिनीची दुरूस्ती करण्यात आली.
शीळ धरणात अल्प पाणीसाठा असताना जलवाहिनी फुटणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली.नवीन नळपाणी योजनेतील जलवाहिनीच्या कामाच्या दर्जाबाबत यापूर्वीही अनेकांनी शंका उपस्थित केली होती.भर उन्हाळ्यात अशी जलवाहिनी फुटत राहिली तर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त होत आहे.