जिंदाल कंपनीच्या प्रदुषणाविरोधात शिवसेना जनआंदोलन उभारणार, संजय पुनसकर यांचा इशारा

जिंदाल कंपनीमध्ये वायूगळती झाल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यासाठी साधी रुग्णवाहिकाही जिंदाल कंपनीने दिली नाही. जिंदाल कंपनीचा मनमानी कारभार सुरु आहे. जिंदाल कंपनीच्या आवारात कोणालाही जाऊ दिले जात नाही. जिंदाल कंपनीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून त्याचा फटका आंबा आणि मासे उत्पादनाला बसला आहे. आता हे प्रदूषण तालुक्यात पसरत असून त्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरुन जनआंदोलन उभारणार आहे, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

गुरुवारी जिंदाल कंपनीमध्ये एलपीजी वायूगळती होऊन 68 विद्यार्थी आणि एक महिला अशी 69 जणांची प्रकृती बिघडली. त्यानंतर जिंदाल कंपनीच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी पत्रकार परिषदेत जिंदाल कंपनीच्या कारभाराचा पाढा वाचला. यावेळी शहरसंघटक प्रसाद सावंत, विभाग प्रमुख साजीद पावसकर उपस्थित होते.

बाधित विद्यार्थ्यांची जबाबदारी कंपनीने घ्यावी

माध्यमिक विद्यामंदिर जयगडमधील 68 विद्यार्थ्यांना वायूगळतीमुळे त्रास झाला. या विद्यार्थ्यांना भविष्यातही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे भविष्यात कंपनीने त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच बाधित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.