Ratnagiri News – रत्नागिरीत सापडल्या 150 ब्राऊन हेरॉईनच्या पुड्या, एकजण अटकेत

अंमली पदार्थ विक्रीविरोधात रत्नागिरी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून एमआयडीसी परिसरात गस्ती दरम्यान पोलिसांनी 150 ब्राउन हेरोईनच्या पुड्या विक्रीसाठी आणणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरफोड्या व चोऱ्या यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या घटनांना प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके रत्नागिरी शहरामधील महत्त्वाच्या ठिकाणी गस्त घालत होती. बुधवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व पथक हे रत्नागिरी शहरामध्ये गस्त घालत असताना रत्नागिरी एम.आय.डी.सी येथील आबूबकर आईस फॅक्टरी शेजारी धामस्कर चिकन शॉप या ठिकाणी एक संशयित ब्राऊन हेरोईन घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या या गोपनीय माहितीच्या आधारे, एमआयडीसी परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. याच दरम्यान एक संशयित दुचाकीवर बसून हातात एक पिशवी घेवून संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची अधिक चौकशी व तपासणी केली असता त्याने आपले नाव अरमान लियाकत धामस्कर असे सांगितले. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्याच्या ताब्यातून 150 ब्राऊन हॅरॉईन अंमली पदार्थाच्या पुड्या व इतर साहित्य पोलिसांना सापडले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाद्वारे मिळून आलेला सर्व अमली पदार्थ व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीस ताब्यात घेऊन रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 211/2024 एन.डी.पी.एस ॲक्ट कलम 8 (क), 22 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, सुभाष भागणे, शांताराम झोरे, विनोद कदम, बाळू पालकर, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर, योगेश शेट्ये यांनी केली.