मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल, विविध मागण्यांसठी उमेद संघटनेचा रत्नागिरीत मोर्चा

उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेने जुलै महिन्यात मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनात मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी संघटनेच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अडीच महिने उलटले तरी मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला, कार्यरत केडर, कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.

शुक्रवारी (27 सप्टेंबर 2024) रत्नागिरीत जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारे उमेद अभियान हे महिला स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यापासून महिलांना व्यवसायात उभे करण्यापर्यंत गावोगावी काम करत आहे. राज्यात सुमारे 84 लाख कुटूंबे या अभियानात समाविष्ट आहेत.

त्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरुपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्यावी. सर्व कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी संघटनेने आंदोलन सुरू केले असून गावस्तरापासून राज्यस्तरापर्यंत हे आंदोलन टप्प्याटप्प्याने राबवले जाणार आहे.