Ratnagiri News – महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! कोकणातील कर्दे गावाचा सर्वोकृष्ट कृषी पर्यटन पुरस्काराने सन्मान

दापोली तालुक्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटनाच्या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या नावलौकिकात कर्दे गावाच्या सन्मानानुळे भर पडली आहे. त्यामुळे येथील पर्यटनात चांगलीच वाढ होऊन त्यातून रोजगार निर्मिती होण्यास वाव मिळणार आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या सर्वोत्कृष्ट ग्राम स्पर्धा योजनेतील स्पर्धेत सहभागी झालेल्या 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 991 गावांपैकी 8 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 36 गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली. त्यामध्ये स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्दे गावाला मान्यता मिळाली. कर्दे गावाला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून मिळालेला कृषी पर्यटनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे आणि यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळून कोकण किनारपट्टीवरील पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे.

2023 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आणि त्यांच्या भागातील पर्यटनाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गावांच्या प्रयत्नांना मान्यता देणे हा आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा संवर्धन, समुदाय-आधारित पर्यटन आणि शाश्वत विकास यासारख्या क्षेत्रातील त्यांच्या उपक्रमांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येते. त्यानुसारच कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठीच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी कर्दे गावाची करण्यात आलेली निवड ही योग्यच आहे. कारण कर्दे ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन तोडणकर यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली गावाने पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम गावात राबवले आहेत.

शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या गावाच्या प्रयत्नांची आणि स्थानिक पर्यावरण आणि संस्कृती जतन करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेची मान्यता म्हणून हा पुरस्कार दिला जातो. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाची सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम स्पर्धा योजना ही सर्वोत्तम पर्यटनस्थळ या बिरुदास पात्र ठरणाऱ्या गावाचा गौरव करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ ही स्पर्धा सुरू केली आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन करणाऱ्या, समुदायाधारित मूल्ये आणि जीवनशैलीला प्रोत्साहन देणे तसेच आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय अशा सर्व पैलूंसह शाश्वततेप्रती सुस्पष्ट वचनबद्धता असणाऱ्या, पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावाला हा पुरस्कार देऊन सन्मानित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

१) सर्वोत्तम पर्यटन ग्राम – वारसा , २) सर्वोत्तम पर्यटन ग्राम – कृषी पर्यटन ३) सर्वोत्तम पर्यटन ग्राम – हस्तकला ४) सर्वोत्तम पर्यटन ग्राम – दायित्व निभावणारे पर्यटन ५) सर्वोत्तम पर्यटन ग्राम – चैतन्याने सळसळती गावे ६) सर्वोत्तम पर्यटन ग्राम – साहसी पर्यटन ७) सर्वोत्तम पर्यटन ग्राम – समुदायाधारित पर्यटन ८) सर्वोत्तम पर्यटन ग्राम या विभागात उत्कृष्ट काम केलेल्यांकडून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव मागविण्यात येतात. त्यातील कृषी पर्यटन सर्वोत्कृष्ट ग्राम पुरस्काराचा सन्मान दापोली तालुक्यातील कर्दे गावाला मिळाल्याने कर्दे गावाचे नाव यापुढे पर्यटनाचे गाव म्हणून जागतिक नकाशावर झळकणार आहे.