Ratnagiri News : मुसळधार पावसाने रत्नागिरीचे जनजीवन विस्कळीत, पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

गेले चार दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे रत्नागिरीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली असून खेड मधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तसेच 30 जून ते 2 जुलै पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी (24 जून) सायंकाळपासून रत्नागिरीत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सलग चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे रत्नागिरीकरांना सुर्यदर्शन दुर्मिळ झाले आहे. गेल्या 24 तासात पावसाने संपुर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. मंडणगड मध्ये 100 मिमी पाऊस पडला. दापोलीत 62.28 मिमी, खेडमध्ये 53 मिमी, गुहागरमध्ये 79.80 मिमी, चिपळूणमध्ये 79.11 मिमी, संगमेश्वरमध्ये 65.33 मिमी, रत्नागिरीत 66.88 मिमी, लांजामध्ये 100.60 मिमी आणि राजापूरमध्ये 69.37 मिमी पाऊस पडला. अशाप्रकारे गेल्या 24 तासात जिल्ह्यात 677.12 मिमी पाऊस पडला आहे.

पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहणार असून 30 जून ते 2 जुलै पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.