Ratnagiri News : जांभरूण शाळा क्र.1 मध्ये आनंददायी शनिवार, अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास

रत्नागिरी तालुक्यातील शाळा जांभरूण क्र. 1 मध्ये आज (29 जून) आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम रहावे. तसेच त्यांना कला व क्रीडा या प्रकारांचा आनंद घेता यावा यासाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी व त्यांच्या मनात सहकारवृत्तीची भावना निर्माण व्हावी, नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि संकटावर मात करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. शैक्षणिक वर्ग न घेता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्राणायाम योग, ध्यानधारणा, आपत्ती व्यवस्थापनाची तत्वे आणि प्रशिक्षण, दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा यासारख्या सामाजीक घटकांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची अभिरुची वाढावी, सहानुभूती, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, उत्तम मनुष्यत्वाचा विकास व्हावा यासाठी हा उपक्रम घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. याचाच एक भाग म्हणून शाळेत आनापान सती, योगासने, उभे व बैठे व्यायाम प्रकार, मनोरंजक खेळ, रस्सीखेच, प्रश्नमंजुषा हे उपक्रम घेण्यात आले.

सडये केंद्राचे केंद्रीय प्रमुख अमर घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेश पवार व संतोष रावणंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी राजू कोकणी, कोतवाल यांनी मेहनत घेतली. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित सावंत, सरपंच गौतम सावंत, उपसरपंच थेराडे यांनी कौतुक केले आहे.