नाटे येथील दुकानफोडी करणाऱ्या चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

राजापूर तालुक्यातील नाटे येथे घरफोडी करणाऱ्या 4 आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहिम राबवली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडी आणि चोरींच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि तपासासाठी विशेष पथके तयार केली. 20 ऑगस्ट रोजी नाटे बाजारपेठेतील झैद मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 49 मोबाईल हॅण्डसेट, टॅब व अन्य साहित्य असे एकून 6 लाख 83 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. दुकानाचे मालक नासीर काझी यांनी नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाटे परिसरात कंत्राटी बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी केली असता या गुन्ह्यातील आरोपी कर्नाटक आणि मुंबईमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन पथके तयार करून एक कर्नाटकला आणि दुसरे मुंबईला पाठवले.

कर्नाटकात गेलेल्या पथकाने करण पुजारी, वय 26, रा. गुलबर्गा, राहुल रेड्डी चव्हाण, वय 24, रा. गुलबर्गा यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. मुंबई येथे गेलेल्या पथकाने प्रेम कर्माकर, वय 22, रा. गोरेगाव याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. तसेच आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सबन्ना भिमराय कोबळा, वय 24 याला नाटे येथून ताब्यात घेण्यात आले. चारही आरोपींकडून 4 लाख 13 हजार 177 रुपये किंमतीचे 33 मोबाईल हॅण्डसेट, 1 टॅब असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी, तानाजी पवार, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, हवालदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, नितीन ढोमणे, बाळू पालकर, विक्रम पाटील, अमित कदम, प्रवीण खांबे, गणेश सावंत, रमीझ शेख, अतुल कांबळे, राकेश बागुल यांनी केली. या सर्व पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.