रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तात्काळ भुलतज्ञ हजर करा अन्याता शिवसेना स्टाईल आंदोलन करु, शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांचा इशारा

जिल्हा शासकीय रुग्णालयात भूलतज्ञ नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्हा रुग्णालयात तात्काळ भूलतज्ञ हजर करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा शिवसेना उपनेते आणि आमदार डॉ राजन साळवी यांनी दिला आहे.

शिवसेना उपनेते आणि आमदार डॉ.राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या समस्यांबाबत वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. रत्नागिरी जिल्ह्यात वैद्यकिय महाविद्यालय चालू झाले आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आता वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिकारात अधिकृतपणे आल्यानंतर आज आमदार डॉ. राजन साळवी यांनी वैद्यकिय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. मागील काही दिवस जिल्हा रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. तसेच, मागील काही दिवसांपासून रुग्णालयात भूलतज्ञांची कमतरता असल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. उद्याच्या दिवसात जिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ हजर न झाल्यास शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख महेश पत्की, श्रीकृष्ण चव्हाण व इतर शिवसैनिक उपस्थित होते.