रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला भोपळा, मतदारसंघ न मिळाल्याने भाजप नाराज

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला एकही मतदारसंघ न आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजपच्या वाट्याला गुहागर मतदारसंघ येईल या आशेवर भाजप कार्यकर्ते होते मात्र मिंद्ये गटाने शेवटच्या यादीत गुहागर मतदारसंघ बळकावत भाजप कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर हे पाच मतदारसंघ आहेत. यापैकी चार मतदारसंघ मिंद्ये गटाने बळकावले आहेत. दापोली, रत्नागिरी आणि राजापूर या तीन मतदारसंघात मिंद्ये गटाने आपले उमेदवार पहिल्या यादीत जाहिर केले होते. चिपळूण मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेला.

रत्नागिरी आणि गुहागर हे भाजपचे पारंपरिक मतदारसंघ होते. रत्नागिरी मतदारसंघ मिळणार नाही याची खात्री पटल्यानंतर भाजपला गुहागर मतदारसंघाची आशा होती. या मतदारसंघात भाजपचे माजी आमदार डॉ.विनय नातू इच्छुक होते. मात्र या मतदारसंघावरही मिंद्याचा डोळा गेला. उमेदवार दुसऱ्या पक्षातून आयात करून गुहागर मतदारसंघ मिंद्ये गटाने बळकवल्याने जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला एकही मतदारसंघ आला नाही. गुहागर मतदारसंघ न मिळाल्याने माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.या नाराजीचा फटका मिंद्ये गटाला बसणार आहे.