तुमच्या भावनांचा आदर करतो पण… जाणून घ्या टाटांनी भारतरत्नासाठीची ती मोहीम थांबवण्याची का विनंती केली

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा देश संकटात असताना अनेकदा धावून आलेले आपण पाहिले आहेत. कोरोना काळात देखील रतन टाटा यांनी देशाला मोठी मदत केली होती. त्यांच्या अनेक ट्रस्ट्समधून देशातील सामान्य जनतेला मदत मिळत असते. त्यांच्या कार्याचे अनेक किस्से सोशल मीडियावर ऐकायला पाहायला मिळत असतात.

देशाच्या विकासात रतन टाटा यांचे योगदान मोलाचे आहे त्यासाठी त्यांना भारतरत्न मिळावा यासाठी सोशल मीडियावर एक मोहीम सुरू करण्यात आली होती. वक्ते डॉ. विवेक बिंद्रा यांनी ही मोहिम सुरू केली होती. त्यानंतर देशभरातील सोशल मीडिया युजर्सने ही मागणी धरून ठेवली होती. #BharatRatnaForRatanTata हा ट्रेंड सुरू झाला होता.

मात्र त्यानंतर स्वत: रतन टाटा यांनी ही मोहीम थांबविण्याची विनंती केली होती. ‘मला तुमच्या भावनांचा आदर आहे, मात्र मी तुम्हाला विनंती करतो की ही मोहीम बंद करा. मी हिंदुस्थानी असणे… हिंदुस्थानच्या विकास आणि सफलतेसाठी माझे योगदान असणे यासाठी स्वतःला भाग्यशाली समजतो!, असे रतन टाटा यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटले होते.