महाराष्ट्राला सुख, शांती, स्थैर्य लाभू दे! रश्मी ठाकरे यांच्या हस्ते टेंभीनाक्यावरील दुर्गेश्वरीची महाआरती

महाराष्ट्राला सुख, शांती आणि स्थैर्य लाभू दे, सर्वसामान्यांचे आयुष्य आनंदी होऊ दे तसेच उत्तम आरोग्य मिळू दे, असे साकडे आज रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाका येथील दुर्गेश्वरीला घातले. तसेच त्यांनी देवीची खणा-नारळाने ओटी भरून अंबेमातेची महाआरतीदेखील केली. यावेळी महिला आघाडीच्या रणरागिणींनी टेंभीनाक्यावर तुफान गर्दी केली होती. प्रचंड उत्साह व जल्लोषात महिला आघाडीच्या वतीने रश्मी ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. ‘अंबेमाते की जय… जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी टेंभीनाक्याचा परिसर दणाणून गेला.

शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाका येथे अंबेमातेच्या नवरात्रोत्सवाचा शुभारंभ केला. यंदाचे 47 वे वर्ष असून दरवर्षी ठाकरे कुटुंबीय देवीचे दर्शन घेऊन महाआरती करतात. ही परंपरा यावेळीही कायम राहिली. रश्मी ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच मंत्रोच्चारात पूजा केल्यानंतर संबळाच्या तालावर ‘दुर्गे दुर्घट भारी’ ही आरती करण्यात आली. रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाण्याच्या वेशीपासून शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.

शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपनेत्या विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, चित्रा राऊत, रत्नमाला भोईर, संजना घाडी, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, नंदिनी विचारे, महेश्वरी तरे, उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, ज्योती कोळी, सीमा रजपूत, शहर संघटक वैशाली शिंदे, प्रमिला भांगे, अनिता प्रभू, विद्या कदम, कांता पाटील, सुषमा राणे, मंजिरी धमाले, शीतल मेंढे, उषा बोरुडे, रोशनी शिंदे, संपर्कप्रमुख सुभाष मस्कर, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, दीपक साळवी, संजय तरे, सचिन चव्हाण, मंदार विचारे, प्रतीक राणे, प्रदीप पूर्णेकर, अमोल हिंगे, संजय दळवी, विश्वास निकम, संजय कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

महिलांचा सन्मान

– टेंभीनाका येथील दुर्गेश्वरीच्या दर्शनानंतर सौ. रश्मी ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे दिवंगत उपनेते अनंत तरे यांच्या निवासस्थानी जाऊन तेथे विराजमान झालेल्या देवीचेही दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी चंदनवाडी शिवसेना शाखा व रामचंद्रनगरमधील नवरात्रोत्सवालादेखील भेट दिली. प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक व महिलांच्या उत्साहाला उधाण आले होते. सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते स्वसंरक्षण शिबिरात सहभागी झालेल्या महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.