दुर्मिळ प्रजातीच्या मृदुकवचाच्या कासवांना मिळाले जीवनदान…!

उन्हाच्या दाहकतेने परिसिमा गाठल्याने यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तलाव झपाट्याने कोरडे पडु लागले आहेत. याच कारणामुळे जिल्ह्यातील मुख्य जलवाहीनी असलेल्या सिना नदीला जोडणारे तलाव व उपतलावही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे या नदीमध्ये नैसर्गिक अधिवास असलेल्या व अनेक भागांमध्ये अतिशय दुर्मिळ समजल्या जाणार्‍या इंडियन सॉफ्ट शेल टर्टल अर्थात भारतीय मृदुकवचाच्या कासवाच्या प्रजातीसुद्धा संकटात सापडल्या आहेत. तलाव कोरडे पडल्याने कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या व पाण्याअभावी तडफडणार्‍या दोन मृदुकवचाच्या कासवांना जिल्ह्याच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणांहुन वाचविण्यात निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहाच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.

इंडियन सॉफ्ट शेल टर्टल अर्थात भारतीय मृदुकवचाचे कासव हे गोड्या पाण्यात राहणारी कासवाची प्रजाती असुन त्यांच्या पाठीवरील कवच हे अतिशय चकचकीत व मऊ असते त्यामुळेच त्याचे नाव मृदुकवचाचे कासव असे ठेवण्यात आले आहे. हे कासव खुप भित्रे व एकांतप्रिय असते त्यामुळे ते सहजा सहजी जवळ येत नाही. जुन जुलै मध्ये ते विणीसाठी नदी अथवा तलावपाञाच्या बाहेर किणार्‍याला मातीत अथवा शेतांमध्ये खड्डे करून अंडी घालतात. त्यांची लांबी तीन फुटापर्यंत वाढु शकते. पाण्यात पडलेला पालापाचोळा,कुजणारे पदार्थ,शेवाळ , किटक ,जलपर्णी,मासे असे त्यांचे अन्न असल्याने ते पाणी स्वच्छ करण्याचे कार्य सातत्याने करत राहतात त्यामुळे पर्याणात या कासवांना खुप महत्वाचे स्थान आहे. अंधश्रद्धेतुन या कासवांची तस्करी अथवा शिकार केली जाते त्यामुळे कासवांच्या या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे.

पहिल्या घटनेत नगर तालुक्यातील वाकोडी येथील चि.आराध्य व अर्णव गायके या भावंडांना शेतात जात असताना भटक्या कुञ्यांच्या तावडीत सापडलेले मृदुकवचाचे कासव दिसले त्यांनी कुञ्यांच्या तावडीतुन त्या जखमी कासवाची मुक्तता करून घरी आणले व निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन समुहाच्या जयराम सातपुते यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडे सुपुर्त केले. दुसरी घटना पारनेर येथील दशरथ शिंदे यांना उनामुळे कोरड्या पडलेल्या तलावात तडफडत असलेले मृदु कवचाचे कासव कावळ्यांनी घायाळ केलेले आढळुन आले त्यांनी संघटनेच्या ऋषीकेश परदेशी यांचेशी संपर्क करून त्यांच्याकडे सुपुर्त केले.

निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन समुह व वनविभागाच्या सहकार्याने जखमी व तणावात गेलेल्या या दोन्ही कासवांवर सुमारे आठदिवस यशस्वी उपचार करण्यात आले. या कार्यात जिल्हा उपवनअधिकारी सुवर्णा माने यांनी वेळोवेळी अगदी तातडीने मोलाचे सहकार्य केले. तंदुरूस्त झालेल्या या कासवांना वनविभागाचे वनरक्षक विजय चेमटे यांच्या उपस्थितीत पुन्हा सीनानदीपाञात त्यांच्या मुळ अधिवासात मुक्त करण्यात आले. निसर्गप्रेमी नागरिक व वनविभागाच्या सहकार्याने या दुर्मिळ कासवांना योग्य वेळी मदत पोहचु शकल्याने त्यांना वाचवता येणे शक्य झाल्याने उपस्थित नागरिकांनी सर्वांचे कौतुक केले.

भारतीय मृदुकवचाचे कासव हे सामान्यत: सर्वञ आढळत असले तरी अनेक भागांमध्ये ते दुर्मिळ होत चालले आहे.म्हणुनच शासनाच्या विशेष यादीत त्याला संरक्षित प्रजाती म्हणुन अंतर्भुत केलेले आहे.अहमदनगरच्या सिनानदीत याचा नैसर्गिक अधिवास असणे हे आपल्या जिल्ह्याच्या जैवविविधता संपन्नतेच्या दृष्टीने आपणा सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. म्हणुनच आपण सर्वांनी या प्रजातीच्या संरक्षणार्थ प्रयत्न करायला हवेत.
– जयराम सातपुते, निसर्गअभ्यासक.