रणजी करंडकात महाराष्ट्र डर्बी, रणजी इतिहासात दुसऱ्यांदाच महाराष्ट्राचे संघ अंतिम लढतीत

नाटय़मय वळणावर असलेल्या रणजी करंडक क्रिकेटच्या उपांत्य सामन्यात विदर्भने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. आदित्य ठाकरे व यश ठाकूरने फक्त 30 धावा देत चार फलंदाजांना 10.3 षटकांत तंबूचा रस्ता दाखवत मध्य प्रदेशच्या डाव 258 धावांत संपवला. आता रणजी करंडकाच्या इतिहासात 53 वर्षांनंतर जेतेपदासाठी महाराष्ट्राचेच मुंबई आणि विदर्भ हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची डर्बी कोण जिंकतो, याकडे येत्या 10 मार्चपासून अवघ्या हिंदुस्थानचे लक्ष या लागले असेल.

व्हीसीए स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्याच्या शेवटच्या दिवशी विजय नोंदवून अंतिम फेरी गाठण्यासाठी विदर्भला चार विकेट टिपणे आवश्यक होते तर मध्य प्रदेशला 93 धावांची गरज होती. त्यामुळे कोण विजय नोंदविणार याबद्दल सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. विजयासाठी आवश्यक 321 धावांचा पाठलाग करणाऱ्या मध्य प्रदेशने 6 बाद 228 धावांवरून शेवटच्या दिवसाचा खेळ प्रारंभ केला. धावसंख्येत चार धावा अधिक होताच नाबाद शून्यावरून पुढे खेळणाऱ्या कुमार कार्तिकेयचा याच धावसंख्येवर यश ठाकूरने त्रिफळा उडवित विकेट टिपण्याची मोहीम सुरू केली. नाबाद 16 धावांवरून पुढे खेळणारा सारांश जैन खेळपट्टीवर टिकण्यात यशस्वी ठरला असताना आदित्य ठाकरेने अनुभव अग्रवालला भोपळाही पह्डू दिला नाही.

विदर्भाने मध्य प्रदेशची स्थिती 8 बाद 234 करीत विजयाकडे वाटचाल सुरु केली. धावसंख्येत सहा धावा अधिक होताच चिवट फलंदाजी करणाऱ्या सारांश जैनला (25) यश ठाकूरने त्रिफळा उडविला. शेवटच्या जोडीने मध्य प्रदेशची धावसंख्या 258 केली असता यश ठाकूरने कुलवंत खेजरोलियाचा (11) त्रिफळा उडवित मध्य प्रदेशचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंग करीत विदर्भने दिमाखात अंतिम फेरीत धडक दिली. विदर्भच्या अक्षय वखरे व यश ठाकूरने प्रत्येकी तीन तर आदित्य सरवटे व आदित्य ठाकरेने प्रत्येकी दोन विकेट घेऊन विदर्भाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. मंगळवारी शतकी खेळी करणारा यश राठोडचा विदर्भच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

53 वर्षांनंतर पुन्हा महाराष्ट्राचे संघ आमने सामने

रणजी करंडकाच्या 89 वर्षांच्या इतिहासात 1970-71 साली मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यात जेतेपदाची मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर लढत झाली होती आणि त्यात मुंबईने महाराष्ट्राचा 48 धावांनी पराभव करत सलग 13 वे जेतेपद पटकावले होते. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे दोन्ही संघ मुंबईतच आमने सामने येणार आहेत.