अय्यर नहीं, फायर हूं मैं…; श्रेयस अय्यरचे तडाखेबंद द्विशतक, मुंबईला निर्णायक विजयाची संधी

आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, दोन्ही पातळींवर सापत्न वागणूक मिळणाऱ्या श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा तडाखेबंद फलंदाजीने आपल्या टीकाकारांना आणि कथित हितचिंतकांना अक्षरशः फोडून काढले. आधी कसोटी संघातून डावलण्यात आलेल्या श्रेयसला दोन दिवसांपूर्वी खुद्द कोलकाता नाईट रायडर्सकडूनही अपमानास्पद वागणूक मिळाली आणि त्यामुळे पेटून उठलेल्या श्रेयसने आपला सारा राग ओडिशाच्या गोलंदाजांवर काढला. त्याने 228 चेंडूंत 233 धावांची घणाघाती खेळी करत मुंबईला धावांचा डोंगर उभारून दिला. श्रेयसच्या द्विशतकानंतर सिद्धेश लाडने 169 धावांची संयमी खेळी साकारली, तर सूर्यांश शेडगेच्या 79 धावांच्या झंझावातामुळे मुंबईने 4 बाद 602 धावांवर आपला डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसअखेर ओडिशाची 5 बाद 146 अशी अवस्था करत रणजी करंडकाच्या चौथ्या सामन्यात निर्णायक विजयाच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. ओडिशाला डावाचा मारा टाळण्यासाठी अद्याप 456 धावांची गरज आहे. मुंबईला हा सामना बोनस गुणासह जिंकण्याची नामी संधी आहे.

श्रेयस अय्यरसाठी हे वर्ष जितके धक्कादायक गेले, तितकेच आनंदाचेही ठरले आहे. गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे त्याला हिंदुस्थानी क्रिकेट संघाबाहेर काढण्यात आले होते. नंतर बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीतूनही वगळण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला. या धक्क्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळून मुंबईला आठ वर्षांनंतर रणजी विजेतेपद मिळवून देण्याचा पराक्रम केला, पण या कामगिरीचे कौतुक किंवा इनाम म्हणून त्याला हिंदुस्थानी संघापासून दूरच ठेवण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महामालिकेसाठी त्याच्या नावाचा साधा विचारही करण्यात आला नाही. त्यातच त्याने कोलकाता नाईट रायडर्सला आपल्या नेतृत्वाखाली एका दशकानंतर आयपीएल जेतेपद जिंकून देण्याचा करिष्मा केला. श्रेयसच्या या कामगिरीला केकेआर फ्रेंचायझीने चक्क पायदळी तुडवले आणि त्याला संघातून मुक्त करण्याचा निर्णय जाहीर करत त्याचा घोर अपमान केला. आयपीएलच्या इतिहास विजेत्या कर्णधाराला अद्याप अशी वागणूक कधीही दिली गेली नव्हती.

इतक्या नकारात्मक गोष्टी होत असतानाही श्रेयसची बॅट कालही तळपली होती आणि ती आजही तुटून पडली. त्याने शंभरपेक्षा अधिक स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडताना चौकार-षटकारांची आतषबाजी करत अवघे बीकेसी दणाणून सोडले. त्याचा धावांचा वेग इतका भन्नाट होता की, त्याने आपल्या 233 धावांत 24 चौकार आणि 9 षटकार खेचत चक्क 150 धावा फटकावून काढल्या. हे त्याचे तिसरे प्रथम श्रेणी द्विशतक ठरले. एवढेच नव्हे तर त्याने सिद्धेश लाडसह चौथ्या विकेटसाठी 354 धावांची भागी रचत मुंबईला पाचशेचा टप्पा गाठून दिला. श्रेयसने कालच सलग शतक झळकावले होते. दोन आठवडय़ांपूर्वी महाराष्ट्रविरुद्धचा सामना खेळतानाही त्याने 142 धावा केल्या होत्या. आता त्याच्या या खणखणीत खेळीचा टीकाकारांवर आणि आयपीएल फ्रेंचायझीवर परिणाम होतो की नाही, ते लवकर कळेलच.

10 षटकांत 94 धावा

अय्यरच्या फटकेबाजीनंतर नवोदित सूर्यांश शेडगेचे आगमन झाले आणि त्यानेही अंगात वारे संचारल्यासारखी वेगवान फलंदाजी केली. त्याने अवघ्या 10 षटकांच्या फलंदाजीत सिद्धेश लाडच्या साथीने 94 धावांची नाबाद भागी रचली. यात 79 धावा त्याच्या एकटय़ाच्याच होत्या. त्याने 36 चेंडूंत 7 चौकार आणि 6 षटकार खेचत ओडिशाच्या गोलंदाजांना सैरभैर केले. सिद्धेशने 337 चेंडूंत 169 धावांची संयमी आणि नाबाद खेळी साकारली. सूर्यांशचा झंझावात पाहता तो वेगवान शतक झळकावण्याचा प्रयत्नात होता, पण त्याआधीच कर्णधार अजिंक्य रहाणेने आपला डाव घोषित केला. त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात सूर्यांशचे शतक अवघ्या एका धावेने हुकले होते.

ओडिशाची घसरगुंडी

ओडिशाचा सलामीवीर स्वास्तिक समळ शून्यावर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर अनुराग सारंगी (39) आणि संदीप पटनायक (ना. 73) यांनी 110 धावांची भागी रचत संघाला सुस्थितीत आणले, पण त्यानंतर हिमांशू सिंग आणि शम्स मुलानीच्या फिरकीने ओडिशाला चार धक्के दिले. त्यामुळे दिवसअखेर 146 धावांत ओडिशाचा अर्धा संघ गारद करत मुंबईने दुसऱ्याच दिवशी सामन्यावर आपली पकड मजबूत केली. सामन्याचे अजून दोन दिवस शिल्लक असून ओडिशा 456 धावांनी पिछाडीवर आहे. मुंबईला डावाने विजय नोंदवत बोनस गुणाची कमाई करण्याची सुवर्णसंधी आहे.

शुभम शर्माचे द्विशतक

मध्य प्रदेशच्या कर्णधार शुभम शर्माने आपल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकावताना वेंकटेश अय्यरच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 366 धावांची भागी रचली. या भागीच्या जोरावर मध्य प्रदेशने 616 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल बिहारने 4 बाद 131 अशी मजल मारली होती.

जम्मूकश्मीर विजयासमीप

मेघालयाचा पहिला डाव अवघ्या 73 धावांत गुंडाळल्यानंतर जम्मू-कश्मीरने कालच 52 धावांची आघाडी घेतली होती. आज दुसऱ्या दिवशी त्यांचा डाव 194 धावांवर आटोपला आणि त्यानंतर मेघालयाचाही दुसरा डाव 195 धावांवर संपल्यामुळे जम्मू-कश्मीरला विजयासाठी 75 धावांची गरज आहे. दुसऱ्या दिवसअखेर त्यांनी
1 बाद 16 अशी मजल मारल्यामुळे त्यांचा संघ विजयापासून
59 धावा दूर आहे. काल 16 फलंदाज बाद झाले.