अंतिम आठमध्ये स्थान मिळवण्यासाठी ‘अ’ आणि ‘क’ गटात प्रचंड चुरस
छत्तीसगडविरुद्ध मिळवलेली एका धावेची आघाडी मुंबईच्या पथ्यावर पडली असून मुंबई रणजी करंडकाच्या ‘ब’ गटातून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. मुंबईने अनिर्णितावस्थेकडे झुकलेल्या सामन्यात 6 बाद 253 अशी मजल मारली. पहिल्या डावात मिळवलेल्या एका धावेच्या आघाडीमुळे मुंबईने 3 गुण मिळवत रणजी करंडकाच्या अंतिम आठ संघात आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच ‘ब’ गटातून आंध्र प्रदेशने उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर आपलेही उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशने बडोद्याचा डावाने पराभव करत बोनस गुणासह 7 गुण मिळवत अंतिम आठमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता अखेरचा साखळी सामना 16 ते 19 फेब्रुवारीदरम्यान खेळला जाणार आहे आणि यातून आणखी पाच संघांचे स्थान उपांत्यपूर्व फेरीसाठी पक्के होईल.
आज मुंबईच्या फलंदाजांनी फलंदाजीचा सराव केला. भूपेन लालवानी आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी करत छत्तीसगडला फार यश मिळू दिले नाही. अजय मंडलने आजचे सर्वचे सर्व 5 बळी टिपले. त्याने 65 धावांत 5 विकेटस् टिपत मुंबईला गुंडाळण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईने तिसऱया सत्रात अडीचशेचा पल्ला गाठून सामना अनिर्णित राखला. ‘ब’ गटात मुंबई आणि आंध्र वगळता एकाही संघाची समाधानकारक कामगिरी न झाल्यामुळे उर्वरित सहाही संघ एक सामना आधीच स्पर्धेतून बाद झाले आहेत.
‘अ’ आणि ‘क’ गटात प्रचंड चुरस
‘अ’ गटात विदर्भने महाराष्ट्राचा दहा विकेटस्नी धुव्वा उडवत सहा गुण मिळवत सर्वाधिक 27 गुणांसह अव्वल स्थान संपादले. तरीही ते आपले अंतिम आठ संघांतील स्थान पक्के करू शकले नाहीत. ‘अ’ गटात हरयाणा, सौराष्ट्र आणि सेनादलाने निर्णायक विजय मिळवत आपले आव्हान जिवंत राखले आहे. परिणामतः आज सेनादलाकडून मात खाल्लेल्या राजस्थानचेही आव्हान कायम आहे. या पाचही संघांना उपांत्यपूर्व फेरीची संधी असून जो शेवटच्या सामन्यात निर्णायक विजय मिळवेल तोच अंतिम आठमध्ये पोहोचेल. ‘अ’ गटाप्रमाणे ‘क’ गटातूनही कर्नाटक, तामीळनाडू, गुजरात, रेल्वे आणि त्रिपुरा या पाचही संघांना उपांत्यपूर्व फेरी गाठता येऊ शकते. केवळ अखेरच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. ‘ड’ गटातून मध्य प्रदेशने सर्वप्रथम पुढच्या फेरीत स्थान मिळवले आहे. आता बडोदा आणि जम्मू आणि कश्मीर या दोन संघांपैकी एक पुढच्या फेरीत प्रवेश करील. फक्त अखेरच्या सामन्यात त्यांना विजय अपेक्षित आहे.
कर्नाटक-तामीळनाडूचा थरारक शेवट
विजयासाठी 355 धावांचा पाठलाग करणाऱया कर्नाटकने शेवटच्या दिवशी शेवटच्या षटकापर्यंत 338 धावांपर्यंत मजल मारली आणि सामना अनिर्णितावस्थेत संपला. दोन्ही संघांना विजयाची नामी संधी होती; पण कर्नाटकला विजयासाठी 17 धावा, तर तामीळनाडूला 2 विकेटस् कमी पडल्या. जर कोणत्याही संघाला विजय मिळवण्यात यश मिळाले असते तर त्याचे अंतिम आठमधील स्थान पक्के झाले असते. पण आत ‘क’ गटातून कोणता संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतो ते अखेरच्या साखळी लढतीतूनच निश्चित होऊ शकेल.