ईशान किशनला लागली लॉटरी; थेट कर्णधार पदाची माळ पडली गळ्यात, या संघाचे करणार नेतृत्व

ईशान किशन गेल्या कित्येक महिन्यांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे. तसेच त्याची बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेसाठीही निवड करण्यात आली नव्हती. अशातच आता रणजी ट्रॉफीमध्ये झारखंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

ईशान किशनने टीम इंडियासाठी शेवटचा सामना मागच्या वर्षी खेळला होता. त्यानंतर त्याने टीम इंडियाकडून एकही सामन खेळलेला नाही. तसेच बीसीसीआयने त्याला केंद्रीय करारातून सुद्धा वगळले होते. त्यामुळे ईशान आता पुनरागमनासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करत बीसीसीआयला आकर्षीत करण्याच्या प्रयत्नात आहे. मागच्या महिन्यात झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने आपल्या संघासाठी शतकीय पारी खेळली होती. तसेच ईरणी करंडकामध्ये शेष हिंदुस्थानाकडून खेळताना चांगला खेळ केला होता.

ईशान किशनच्या खेळावर प्रभावित होऊनच झारखंडच्या 16 सदस्यीय संघात त्याची निवड करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर संघाच्या कर्णधारपदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये झारखंडचा पहिला सामना आसामविरुद्ध होणार आहे. मागच्या हंगामात झारखंडच्या संघाचा खेळ निराशाजनक राहिला होता. त्यामुळे या हंगामात ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंड संघाकडून दमदार खेळाची अपेक्षा चाहत्यांना असणार आहे.