रणजी विजेत्या मुंबईला पराभवाची झळ, बडोद्याचा 26 वर्षांनंतर गतविजेत्यांवर विजय

रणजी करंडक आणि इराणी करंडक विजेत्या बलाढय़ मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पराभवाची झळ सहन करावी लागली. बडोदा संघाने गतविजेत्या मुंबईला 84 धावांनी हरवत 26 वर्षांनंतर पहिल्यांदाच मुंबईवर विजय मिळवला. याआधी बडोद्याने मुंबईवर 1998 साली चार विकेट राखून विजय मिळवला होता.

मुंबईला पराभवाचा धक्का देण्याची किमया डावखुऱया फिरकीवीर भार्गव भट्टने दाखवली. त्याने दुसऱया डावात 6 विकेट टिपत मुंबईचा डाव खिळखिळा केला. त्यानंतर बडोद्याने मुंबईचा दुसरा डाव अवघ्या 177 धावांवर संपुष्टात आणत 84 धावांनी दणदणीत विजय साकारला. सिद्धेश लाड आणि श्रेयस अय्यर यांनी थोडाफार प्रतिकार केला असला तरी मुंबईच्या अन्य फलंदाजांनी निराशा केल्यामुळे मुंबईला सलामीच्याच सामन्यात पराभवाची झळ सोसावी लागली.

भार्गवपुढे मुंबईची दाणादाण

रणजी करंडकाच्या पहिल्याच सामन्यात पहिले चार दिवस सामन्याचे पारडे दोन्ही संघांच्या बाजूने झुकत होते. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी मुंबईने विजयासाठी ठेवलेले 262 धावांचे आव्हान गाठण्याच्या दिशेने सुरुवात केली. कालच्या 2 बाद 42 वरून खेळताना मुंबईला सोमवारी 220 धावांची आवश्यकता होती. कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, तनुष कोटियन, सिद्धेश लाड, शम्स मुलानी, शार्दूल ठाकूर असे रथी-महारथी फलंदाज मुंबईकडे होते. त्यामुळे मुंबई हे आव्हान सहज पार करेल, असे वाटत होते. मात्र भार्गव भट्टच्या फिरकी माऱयासमोर मुंबईच्या फलंदाजांची भंबेरी उडाली.

बडोदा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर भार्गव भट्टने अखेरच्या दिवशी कमाल केली. त्याने आयूष म्हात्रे (22), रहाणे (12), श्रेयस (30), सिद्धेश (59), मुलानी (12), शार्दूल (1) या सहा अव्वल फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत बडोद्याचा विजय सुकर केला.

मुंबईचे दिग्गज धारातीर्थी

गेल्या वर्षी रणजी करंडकातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेला तसेच अलीकडेच दुलीप करंडक आणि इराणी चषक स्पर्धेत सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार पटकावलेल्या तनुष कोटियनने बडोद्याविरुद्ध गोलंदाजीत (4-61 आणि 5-61) चमक दाखवली असली तरी फलंदाजीत (1 आणि 1 धाव) मात्र तो अपयशी ठरला. 24 वर्षांचा असतानाही हिंदुस्थानी संघाकडून पाच कसोटी सामने खेळणाऱया पृथ्वी शॉ याला या सामन्यात 7 आणि 12 अशा धावा करता आल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या खराब कामगिरी करणाऱया श्रेयस अय्यरने पूर्ण निराशा केली. पहिल्या डावात आठ चेंडूंत खातेही न खोलणाऱया श्रेयसने दुसऱया डावात 30 धावा केल्या. गेल्या वर्षीप्रमाणेच कर्णधार रहाणेचा रणजी करंडकातील फ्लॉप शो सुरूच आहे. या वर्षीही त्याला चांगली सुरुवात करता आली नाही. 29 आणि 12 धावा अशी त्याची बडोद्याविरुद्ध कामगिरी राहिली.

सिद्धेश लढला

जवळपास दोन वर्षांनंतर मुंबई संघात पुनरागमन केलेल्या सिद्धेश लाड याने रणजी करंडकाच्या पहिल्याच सामन्यात आपले कर्तृत्व सिद्ध केले. मुंबईला मोठय़ा भागीदाऱया रचण्यात अपयश आल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला. सिद्धेश लाडने एकाकी झुंज दिली असली तरी त्याला मुंबईच्या अन्य फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. मुंबईने 73 धावांत सहा विकेट्स गमावल्या. सिद्धेश एका बाजूने तळ ठोकून उभा असताना दुसऱया बाजूने मुंबईची पडझड होत होती.

आता मुंबईसमोर महाराष्ट्राचे आव्हान

बडोदा संघाने बलाढय़ मुंबईवर विजय मिळवून रणजी करंडक स्पर्धेची शानदार सुरुवात केली आहे. आता बडोद्यासमोर दिल्लीत होणाऱया दुसऱया सामन्यात सर्व्हिसेसचे आव्हान असणार आहे. गतविजेत्या मुंबईला सलामीलाच हार पत्करावी लागली असली तरी त्यांना 18 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया दुसऱया सामन्यात महाराष्ट्राशी दोन हात करावे लागणार आहेत.