मुंबईच्या पहिल्याच दिवशी 385 धावा; श्रेयस-सिद्धेशची अभेद्य द्विशतकी भागी

गेल्या सामन्यात निर्णायक सहा गुण मिळवण्यात अपयशी ठरलेल्या मुंबईने आपल्या चौथ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी सहा गुणांची नोंद होईल अशी कामगिरी केली. श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाडने वैयक्तिक शतकासह केलेल्या 231 धावांच्या अभेद्य भागीच्या जोरावर मुंबईने ओडिशाविरुद्धच्या रणजी सामन्याच्या पहिल्याच दिवशी 3 बाद 385 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सिद्धेश (116) आणि श्रेयस (152) खेळत होते.

वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर पुन्हा एकदा मुंबईकरांची बॅट तळपली. हे स्टेडियम नेहमीच मुंबईसाठी भाग्यशाली ठरत असल्यामुळे मुंबईच्या खेळाडूंनी वानखेडेऐवजी याच मैदानाला प्राधान्य दिले आहे. आजही हे स्टेडियम मुंबई संघासाठी भाग्यशाली ठरले. ओडिशाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, जो मुंबईच्या हिताचा ठरला. मुंबईच्या सलामीवीर अंगकृष रघुवंशी आणि अजिंक्य रहाणेला बिप्लव समांत्रयने सलग चेंडूवर बाद करत मुंबईची 1 बाद 154 वरून 3 बाद 154 अशी अवस्था केली. मात्र त्यानंतर सिद्धेश लाड आणि श्रेयस अय्यरने अफलातून खेळ करत मुंबईला दिवसाअखेर चारशेसमीप नेले आणि वैयक्तिक शतकेही झळकावली. सिद्धेशने या मोसमातील पहिले आणि प्रथम श्रेणीतील नववे शतक साजरे केले तर संघात पुनरागमनासाठी झगडत असलेल्या श्रेयस अय्यरने आपला झंझावाती अवतार दाखवताना 164 चेंडूंत नाबाद 152 धावा तडकावल्या. त्याने या खेळीत 18 चौकार आणि 4 षटकारांचा घणाघात दाखवला. श्रेयसचेही 15 वे प्रथम श्रेणी शतक ठरले आहे. उद्या त्याला आपले दुसरे द्विशतकही झळकावण्याची संधी आहे.

श्रेयसचा पुन्हा शतकी झंझावात

सध्या श्रेयसवर बीसीसीआयची अवकृपादृष्टी असल्यामुळे त्याचा खेळावर दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या वर्षी स्थानिक क्रिकेट न खेळल्यामुळे श्रेयसला बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून काढण्याचे धाडस निवड समितीने दाखवले होते. असे असतानाही त्याने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलचे जेतेपद जिंकून देण्याचा पराक्रम केला तर मुंबईच्या रणजी विजेतेपदातही त्याचा सिंहाचा वाट होता. इतकी जबरदस्त कामगिरी असतानाही श्रेयसला कोलकात्याने आपल्या संघातून मुक्त करण्याचा वेडेपणा करून दाखवला आहे. मात्र या मानसिक त्रासानंतरही आज श्रेयसने आपला सारा राग ओडिशाच्या गोलंदाजांवर काढला. त्याने चौकार-षटकारांची बरसात करत झंझावती शतक झळकावले. त्याने महाराष्ट्राविरुद्धही 142 धावांची जोरदार खेळी केली होती. विशेष म्हणजे हे शतकही याच मैदानावर ठोकले गेले होते आणि मुंबईने या शतकानंतर महाराष्ट्रावर 9 विकेट्सनी रणजी मोसमातील पहिला विजय नोंदवला होता.

अजिंक्य ठरला अपयशी

सध्या हिंदुस्थानी संघात नांगर टाकून फलंदाजी करणाऱया फलंदाजांची उणीव भासत असल्यामुळे क्रिकेटप्रेमींनी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला पुन्हा खेळवा, अशी मागणी केली होती. त्यामुळे आज अजिंक्यला मोठी खेळी करून निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधण्याची नामी संधी होती, पण त्याला बिप्लव समांत्रयने पहिल्याच चेंडूवर पायचीत केले आणि अजिंक्य एकही धाव न करता बाद झाला. अजिंक्यने रणजी मोसमातील पहिल्या तीन लढतींत 29, 12, 31, 35, नाबाद 48 अशा खेळी केल्या आहेत. तसेच त्याने इराणी करंडकात 97 धावांची खेळीसुद्धा केली होती.