घाटकोपरमध्ये एक मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत 14 जण ठार तर 80 लोक जखमी झाले असून ही काही साधी घटना नाही. घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करून या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.
काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी राजावाडी हॉस्पिटला भेट देऊन घाटकोपर दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली व डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार व मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. दोन वर्षांपासून महानगरपालिकेत लोकप्रितिनिधी नाहीत कारण सरकारने निवडणूकच घेतलेली नाही. सर्व कारभार राज्य सरकारच्या निर्देशानुसार महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी चालवत आहेत. घाटकोपरची होर्डिंग दुर्घटना गंभीर असून या घटनेची संपूर्ण चौकशी केल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील, असेही रमेश चेन्निथला म्हणाले.
काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याबरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आ. प्रा. वर्षा गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एस. संदीप, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त आदी उपस्थित होते.