रामदेववाडी हिट अँड रन प्रकरण : तिन्ही मंत्र्यांकडून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न पीडित कुटुंबीयांचा आरोप

रामदेववाडी हिट अँड रन प्रकरणात अपघात घडला त्या वेळी आरोपींच्या गाडीत गांजादेखील सापडला होता. तसेच संशयित आरोपी यांनी गांजाचे सेवन केले असल्याचे मयत पीडित कुटुंबांनी सांगितले. मात्र रक्ताचे नमुने घेऊन 23 दिवस उलटले तरी अद्यापही रिपोर्ट प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे रक्ताचे नमुने घेतले नसल्याचा आरोप मयत पीडित कुटुंबाच्या परिवाराने केला आहे. तसेच या प्रकरणात तिन्ही मंत्र्यांकडून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.

रामदेववाडी हिट अँड रन प्रकरण हे 7 मे रोजी घडले होते. बेधुंद अवस्थेत असलेल्या कारमधील संशयित आरोपींनी दुचाकीवरील चार जणांना चिरडले होते. यात तीन जण हे जागीच ठार झाले, तर एक जण उपचारादरम्यान मयत झाला. मात्र 23 दिवस होऊनसुद्धा पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही. पोलीस प्रशासन हे राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप मयत कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी केला आहे.

लाखाची मदत देण्याची घोषणा होऊन पाच ते सहा दिवस उलटले
मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित कुटुंबाच्या परिवाराला पाच लाखांची मदत देऊ, अशी घोषणा केली. मात्र ही घोषणा होऊन पाच ते सहा दिवस उलटले तरीही या पीडित कुटुंबापर्यंत कुठलीही शासनाची मदत पोहोचलेली नाही. या कुटुंबाला भेटण्यासाठी कुठलेही मंत्री या ठिकाणी आलेले नाहीत. पोलीस प्रशासन हे पूर्ण राजकीय दबावाखाली काम करीत आहे. जळगाव येथे संशयित आरोपींना जेलमध्ये न ठेवता त्यांनी नंदुरबार जेलमध्ये पाठवण्यात आलेले आहे. यामुळे याची पारदर्शक चौकशी होऊन संशयित आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.