गडगंज संपत्तीचे मालक, साधा मोबाईलही नाही, एका अब्जाधीशाची चकित करणारी कहाणी…

आजच्या आधुनिक जगात गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये मोबाईल पहायला मिळतो. पोटाला चिमटा काढून EMI वर Iphone घेणाऱ्यांची संख्या गेल्या काही महिन्यांमध्ये चांगलीच वाढली आहे. मात्र एक कोट्याधीश व्यक्ती याला अपवाद ठरला आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वाला अनुसरुन त्यांनी अफाट संपत्ती कमवली, मात्र आजही ते मोबाईल वापरत नाहीत. तसेच 6 लाख रुपये किंमतीच्या गाडीने प्रवास करतात. कोट्याधीश असूनही सामान्य जीवन जगणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे राममूर्ती त्यागराजन.

राममूर्ती त्यागराजन यांनी सामान्य माणासाला डोळ्या समोर ठेवतं 1960 च्या दशकात एक छोटी चिटफंड कंपनी सुरू केली. आज त्या कंपनीचे रुपांतर मोठ्या वटवृक्षात झाले असून श्रीराम फायनान्स (Shriram Finance) या नावाने ही कंपनी प्रचलीत आहे. कमी उत्पन्न असलेल्या लोकांना बँका कर्ज देत नाहीत. अशा नागरिकांना ही कंपनी कर्ज देते. त्याचबरोबर व्यवसायामध्ये सामान्यांनी पाऊल टाकावे यासाठी ट्रक, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांसाठी सुद्धा कंपनीच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो.

सामाजीक जाणीव असल्यामुळे त्यांच्या एक गोष्ट निदर्शणास आली की, बॅंका कमी उत्पन्न गटातील नागरिकांना कर्ज देत नाहीत. या संधीचा फायदा घेत त्यांनी कमी उत्पन्न असलेल्या व्यावसायिकांना वाहन खरेदीसाठी आणि ट्रक चालकांना व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज देण्यास सुरुवात केली. राममूर्ती त्यागराजन यांच्या दुरदृष्टीमुळे एक मोठा वर्ग कंपनीशी जोडला गेला. त्याचा परिणाम म्हणजे कंपनीची वृद्धी झपाट्याने झाली आणि आज या कंपनीचे बाजार भांडवल (Market Cap) 8.5 बिलियन डॉलर्स आहे.

राममूर्ती त्यागराजन यांची खासीयत म्हणजे त्यांची साधी जीवनशैली. मोबाईल लक्ष विचलित करतो त्यामुळे ते फोन सुद्ध वापरत नाहीत. त्यागराजन हे आता 86 वर्षांचे असून ते कंपनीमध्ये सल्लागाराची भुमिका पार पाडत आहेत. आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी $750 दशलक्ष किंमतीची कंपनीतील भागीदारी विकली आणि ते सर्व पैसे दान केले. त्याचबरोबर त्यांनी श्रीराम कंपनीतील सर्व भागिदारी कर्मचाऱ्यांच्या एका गटाला दान करत 2006 मध्ये स्थापन झालेल्या श्रीराम ओनरशिप ट्रस्टकडे हस्तांतरित केली.

“ज्या लोकांचे जीवन आधिपासून चांगले आहे. त्यांचे जीवन अजून चांगले बनवण्यासाठी मी कधीही उत्सुक नव्हतो. त्याऐवजी मला समस्यांमध्ये अडकलेल्या लोकांच्या जीवनातून गरिबी आणि त्रास दुर करायचा होता.” असे राममुर्ती त्यागराजन यांनी ब्लुमबर्ग न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.