रामनामाचा गजर आणि उत्साह

प्राणप्रतिष्ठापना सोहळय़ाची सांगता होताच मंदिरावर हेलिकॉप्टरमधून झालेल्या पुष्पवृष्टीमुळे, रामलल्ला त्यांच्या सिंहासनावर विराजमान झाल्याचे देश-विदेशांत पोहोचले. सर्वत्र रामनामाचा गजर आणि जयघोष झाला.

84 सेपंद कालावधीच्या ‘अभिजित मुहूर्तावर’ झालेल्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्यात सहभागी झालेले मोदी सर्व विधींच्या सांगतेनंतर रामलल्लांसमोर नतमस्तक झाले होते. रामलल्लांच्या अभिषेकाचे चरणामृत स्वीकारून त्यांनी आपले 11 दिवस उपवासाचे व्रत समाप्त केले.

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार झाले – आदित्य ठाकरे
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले राम मंदिराचे स्वप्न आज पूर्ण झाले. सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचे आणि बलिदानाचे सोनं झालं. प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय असो, जय सिया राम, अशा शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे एक्सवरून भावना व्यक्त केल्या.

आता रामराज्य आणणार – मोहन भागवत
रामराज्य येण्यासाठी आपल्यालाही प्रयत्न करावे लागणार, अशा भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळय़ानंतर भाषणादरम्यान व्यक्त केल्या. आपल्याला कर्तव्य म्हणून आपले वादविवाद, कलह, भांडणे हे सगळे सोडून द्यावे लागेल. असे ते म्हणाले.

रामलल्लाच्या मूर्तीला 5 किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. प्रभू श्रीराम त्यांच्या नखापासून कपाळापर्यंत रत्नजडित असून डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. कपाळाच्या मध्यभागी पांढऱया धातूपासून बनवलेला टिळा आहे.

राम मंदिर सोहळय़ासाठी देशविदेशातून भरभरून दान देण्यात आले. सूरतच्या एका हिरे व्यापारी दिलीपकुमार व्ही लाखी यांनी तब्बल 101 किलो सोने दान दिले.

पाकिस्तानचे फुत्कार
बाबरी मशिद पाडून त्या ठिकाणी बांधण्यात आलेले राम मंदिर आणि सोहळय़ाचा आम्ही निषेध करतो, असे फुत्कार पाकिस्तानने प्रसिद्धी प्रत्रकाद्वारे काढले आहेत.

मीरा रोड येथे हाणामारी
मीरा रोड येथे श्रीराम पालखी मिरवणुकीत दोन गटांत हाणामारी झाली. यात चार तरुण गंभीर तर 20 जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी दहा जणांना अटक केली.

जळगावात दगडफेक
जळगाव जिह्यातील रावेर तालुक्यात प्रभू रामचंद्राच्या भव्य मिरवणुकीत दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी 14 संशयित आरोपींना अटक करण्यात आली.