Rajasthan News – नागरिकांमध्ये वन्य प्राण्यांची दहशत, दहा दिवसात 7 जणांचा हल्ल्यात मृत्यू

राजस्थानच्या उदयपूर आणि सवाई माधोपूरमध्ये वन्य प्राण्यांच्या दहशतीने लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. उदयपूरमध्ये एका पॅंथरच्या हल्ल्यात एक पुजाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर  सवाई माधोपूरमध्ये एका अस्वलाने ज्येष्ठावर हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यानंतर लोकांमध्ये दहशत पसरली असून दहा दिवसांमधील ही सातवी घटना आहे. आतापर्यंत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात सात लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये मुलांचाही समावेश आहे.

सवाई माधोपूरमध्ये एका अस्वलाने संत हितेश्वरानंद (70) यांच्यावर हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना रात्री घडली असून त्यावेळी संत त्यांच्या आश्रमातील छत्रीत झोपले होते. त्यावेळी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐखून शेजारी कमल शर्मा आणि दिनेश स्लामी यांनी धाव घेत त्यांना वाचवले. मात्र त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत, त्यांना उपचारासाठी जयपुर रेफर करण्यात आले आहे.

या हल्ल्यानंतर वनविभागाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जीएफओ अजय चित्तोरा आणि गोगुंडा एसडीएम डॉ. नरेश सोनी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक रहिवाश्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलली जातील.

उदयपूरमध्ये यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. दहा दिवसात एकाच वेळी इतके मृत्यू कधीच झाले नव्हते. संध्याकाळ जवळ येताच गावकरी घरात कोंडून घेत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. घरांमध्ये गुरेही बांधली जात आहेत.