उपमुख्यमंत्र्यांच्या ‘रिलस्टार’ मुलाच्या दिमतीला पोलिसांचा ताफा; व्हिडीओ व्हायरल होताच विरोधकांचा हल्ला

राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रेमचंद यांचा मुलगा आशु बैरवा मोठ्या थाटात मोकळी जीप पळवताना दिसत आहे. विशेष म्हणजे जीपच्या मागे पुढे पोलिसांचा ताफाही दिसतोय. ट्राफिक नियमांचा फज्जा उडवणाऱ्या या व्हिडीओमुळे विरोधक आक्रमक झाले असून व्हीव्हीआयपी प्रोटोकॉलच्या गैरवापरावरून सवाल उपस्थित करत आहेत.

आशू बैरवा याच्यासोबत अन्य तीन तरुणही दिसत आहेत. यातील एकाचे नाव कार्तिकेय भारद्वाज असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते पुष्पेंद्र भारद्वाज यांचा तो मुलगा आहे. विद्यमान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याविरोधात त्यांनी सांगानेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती.

दरम्यान, उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांच्याकडे परिवहन मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार आहे. मात्र त्यांचाच मुलगा आता हात सोडून गाडी चालवत ट्राफिक नियम मोडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून कारवाईची मागणी करत आहेत.

काय आहे व्हिडीओ?

व्हायरल व्हिडीओमध्ये चार तरुण मोकळ्या जीपमधून पावसाचा आनंद घेत जाताना दिसताहेत. जीपच्या मागे-पुढे पोलिसांचा ताफा दिसतोय. जीप चालवणारा उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा असून असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते पुष्पेंद्र भारद्वाज यांच्या मुलानेच हा व्हिडीओ आपल्या इन्टा अकाऊंटला शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही