हराम्यांना घालवल्याशिवाय आराम नाही, मातोश्रीतून उद्धव ठाकरे कडाडले

आज मातोश्रीत सांगोल्याचे राजन तेली आणि दीपक साळूंखे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. आता हराम्यांना घालवल्याशिवाय आराम नाही अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. पण आराम करायचा तरी किती. आधी हराम्यांना घालवायचे आहे आणि आता आराम नाही. आज कामाला सुरुवात केली आणि मुहुर्त चांगला आहे. आबांसारखा गडी शिवसेनेत सामील झालेले आहेत. आबांच्या हातात मशाल दिली आहे, याचा अर्थ प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. आता ही मशाल कशी पेटवायची आणि कुणाला चटके द्यायची हे तुम्ही ठरवायचं आहे. ही निवडणूक सोपी नाही. आजपासून संपूर्ण मतदारसंघात आपली मशाल घराघरात पोहोचवली पाहिजे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

तसेच हे गद्दार नुसते गद्दार नाहीत तर बरेच खोके घेऊन बसलेले आहेत. धनुष्यबाण आणि मशाल असा संभ्रम ते निर्माण करतात. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची निवडणूक चिन्ह मशाल आहे. ही मशाल तुम्हाला आतापासून घराघरात न्यावी लागेल. मला खात्री आहे ज्या उत्साहाने तुम्ही इथे आलेला आहात त्यामुळे विजय आपला नक्की आहे. मी कुठलीही उमेदवारी जाहीर केलेली नाही पण दीपक आबांच्या हातात मशाल दिलेली आहे. या मशालीची धग तुम्हाला दाखवायची आहे. सांगोल्याचा आधीचा आमदार जरी गद्दार झाला तरी सांगोलेकर माझ्यासोबत आहेत हे तुम्ही दाखवून द्या. मला खात्री आहे या शब्दाला तुम्ही जागाल आणि आपला आमदार निवडून आणाल. त्यामुळे प्रचाराला आणि जिंकल्यानंतरही सांगोल्याला येईन असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.