मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका, नंदुरबारमध्ये रेल्वेरुळांवर पाणी साचले, दोन तासांपासून वाहतूक ठप्प

गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने नंदुरबार जिल्ह्याला झोडपून काढले आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली तरी सकल भागात पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीला याचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे सूरत-भुसावळ रेल्वे सेवा गेल्या दीड ते दोन तासांपासून ठप्प झाली आहे. कोळदा चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरुन पाणी वाहत असल्याने रेल्वेची वाहतूक बंद पडली आहे. यामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास झाला आहे.

नंदुरबार मार्गावरुन जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. रेल्वे सेवा कधी पूर्ववत होणार याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यामुळे रेल्वे प्रवाशी रस्ते वाहतुकीचा पर्याय अवलंबताना दिसत आहेत.

दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेला कर्मचाऱ्यांकडून वाट दाखवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.