देशभरातील रेल्वे अपघात रोखण्यासाठी काय केले? चार आठवडय़ांत माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश

देशभरातील रेल्वे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली कवचसह आणखी कुठल्या सुरक्षा उपायांचा अवलंब केला जातो किंवा कुठले उपाय प्रस्तावित आहेत, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मागवली आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने 4 आठवडय़ांनंतर होणाऱया सुनावणीत याचा तपशील देण्यास अॅटर्नी जनरलना सांगितले आहे. वाढत्या रेल्वे अपघातांसंदर्भात चिंता व्यक्त करत विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

गेल्या जूनमध्ये ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेत 293 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, त्यानंतर सरकारने रेल्वे गाडय़ांसाठी कवच प्रणाली सुरू करण्याची चर्चा केली. मात्र अद्याप बालासोरच्या मार्गावरही ही सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आलेली नाही, असे तिवारी यांनी याचिकेत म्हटले आहे. संपूर्ण देशात कवच प्रणाली लागू केल्याने किती आर्थिक बोजा पडेल हे मोजण्यासाठी काही प्रक्रिया अवलंबली आहे का, असा सवाल खंडपीठाने विचारला आहे.