राहुरी-शनिशिंगणापूर राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण धारकांना नोटीसा

राहुरी- शनिशिंगणापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत दोन्ही बाजूने प्रचंड अतिक्रमणे वाढल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या महामार्गावर शनि भक्तांच्या वाहनांचा अपघातात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. परिणामी हा राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग नगर यांनी संबंधित हद्दीवरील ग्रामपंचातीना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्या असून अतिक्रमण धारकांची नावे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान अतिक्रमणावर हातोडा पडणार असल्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत.

राहुरी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 सी पासून प्रारंभ होऊन शनिशिंगणापूर जवळ नगर संभाजी नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 समाप्त होणारा 26 किलोमीटर असून या मार्गाचे रस्ते महामार्ग मंत्रालय दिल्ली यांचे राजपत्र क्रमांकानुसार फेब्रुवारी 2018ला राष्ट्रीय महामार्ग 160 सी. म्हणून घोषित करण्यात आला. राहुरी, सोनई, शनिशिंगणापूर या गावातील हद्दीत रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रचंड प्रमाणात रस्त्यालगत पक्के बांधकामे होऊन अतिक्रमण वाढले आहे. नाल्यावर अतिक्रमण वाढल्याने रस्ता अरुंद झाला आहे. शिर्डीहून येणारे भाविक राहुरी शनिशिंगणापूरला येत असताना या रस्त्यावर अतिक्रमणे वाढल्याने रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे.

शनि भक्तांची वाहने स्थानिक नागरिकांची वाहने शाळा महाविद्यालय कॉलेज हा गजबजलेला रस्ता असल्याने येथे नेहमी अपघात घडतात . अनेक व्यवसायिकांनी आपली दुकाने रोडवर थाटल्याने अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूस विनापरवाना नियम बाह्य अनाधिकृत बांधकामे जाहिराती फलक असल्याचे आढळून आले आहे. सदर बांधकामे ही राष्ट्रीय महामार्गचा हद्दीत येत असल्याने महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग पथ किनारवर्ती उल्लंघन झाले आहे राहुरी शनिशिंगणापूर राष्ट्रीय महामार्गाची शासकीय हद्द रस्त्याच्या मध्या पासून दोन्ही बाजूस प्रत्येकी 15 मीटर 50 फूट इतक्या अंतरापर्यंत आहे. गावात अतिक्रमण झालेल्या धारकांची नावे ग्रामपंचायतने त्वरित राष्ट्रीय महामार्ग उपविभाग नगर यांच्याकडे पाठवावे अशा नोटिसा बजावले आहे. स्वतःहून अतिक्रमणे काढण्यात यावेत अन्यथा खात्याकडून काढले जाईल त्याचा खर्च संबंधित अतिक्रमण धारकावर राहील असे कळविण्यात आले आहे. अतिक्रमणे काढण्याच्या नोटीस ग्रामपंचायतींना बजावल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.

शनिशिंगणापूर राहुरी हा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट स्वरूपाचा असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. संबंधित ठेकेदाराने हा रस्ता बेजबाबदारपणे केला असून 111 कोटी रुपये खर्चून झालेला रस्त्याची कामे डागडुजी पूल अद्यापी सुरू आहे. रस्ता नादुरुस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. पाच वर्ष होऊनही हा रस्ता अपूर्ण स्वरूपात आहे. शिवाय अतिक्रमणाचा वेढा पडल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताची वाढ झाली आहे.

न्यायालयात अडकला, अडीच किलोमीटर रस्ता
नगर मनमाड हायवे ते नगर संभाजी नगर महामार्गाला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग 26 किलोमीटर अंतराचा असताना शनी मंदिरापासून अडीच किलोमीटर हायवेला जोडणाऱ्या रस्ता येथील शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी न्यायायालयात धाव घेतल्याने अडीच किलोमीटरचा रस्ता संभाजीनगर हायकोर्टात प्रलंबित असल्याने अडीच किलोमीटरचा काम गेले पाच वर्षापासून थांबले आहे. परिणामी गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला हा रस्ता पूर्ण होणार का हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे.