आमदार अपात्रतेच्या निकालाआधी नार्वेकर यांची ‘वर्षा’वारी! मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा

आमदार अपात्रता प्रकरणाच्या अंतिम निर्णयाला अवघे तीन दिवस उरले असतानाच विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बंद दाराआड दोघांमध्ये चाळीस मिनिटे चर्चा झाली. दरम्यान, ज्यांच्यासमोर आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे, जे न्यायपालिकेच्या भूमिकेत आहेत तेच या प्रकरणात आरोप असलेल्या व्यक्तीची गुप्तपणे भेट घेतात, मग अशा व्यक्तीकडून न्यायाची अपेक्षा ठेवता येईल का, असा सवाल करत नार्वेकर यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

शिवसेनेशी गद्दारी करणारे एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. 10 जानेवारीला नार्वेकर काय निकाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नार्वेकर यांना या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयानेच लवाद म्हणून नेमले होते. गेल्या आठवडय़ात नार्वेकर यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले होते. आज दुपारी ते अचानकपणे वर्षा निवासस्थानी पोहोचले. तब्बल 40 मिनिटे त्यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे वृत्त आहे. ही नियोजित भेट नसल्याने नार्वेकर नक्की कोणत्या कामासाठी आमदार अपात्रता प्रकरणातील आरोपीच्या घरी गेले याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

अशा लवादाकडून न्यायाची अपेक्षा ठेवायची का?
लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या हिंदुस्थानात न्यायपालिका हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणातील लवाद आहेत. निकाल तोंडावर असतानाच ते आरोपी एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतात हे अनुचित आहे. अशा लवादाकडून न्यायाची अपेक्षा ठेवायची का, असा सवाल शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी यावर प्रतिक्रिया देताना केला.